ठाणे: शहरातील मेट्रोच्या खांबांवर तसेच वाहतूक बेटांवर बेकायदा जाहिरातबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात दर बुधवारी बेकायदा फलक सफाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे शहरात मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात खांब उभारण्यात आले आहेत. या खांबांवर बेकायदा भित्तीपत्रके, फलक, होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. शहर सुशोभीकरण करून ठाण्याचे रूप बदलण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यात, मेट्रोच्या खांबांवर लावण्यात आलेल्या फलकांमुळे समस्या निर्माण होत आहे. मेट्रोचे खांब रंगवण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच, मेट्रो खालील भागात उद्यान, आसन व्यवस्था, सुशोभीकरण यांची कामे सुरू झालेली आहेत. असे असताना बेकायदा फलकांमुळे शहर विद्रूप दिसते. त्यामुळे असे फलक लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. या फलकांबाबत, महापालिका मेट्रो व्यवस्थापनाशी पत्र व्यवहार करीत आहे. मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठकीचेही लवकरच आयोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचा… ठाणे स्थानकातील ‘त्या’ पादचारी पूलाचे काम सुरू होणार
मेट्रोच्या मालमत्तेवरील अनधिकृत फलक, होर्डिंग्ज काढण्यासाठी त्यांनी एखाद्या संस्थेची नेमणूक करावी. त्यांच्यासोबत महापालिकेची यंत्रणा काम करेल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात दर बुधवारी बेकायदा फलक सफाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तिन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त ही मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेत सर्व बेकायदा फलक काढले जाणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.
वाहतूक बेटांवर फलक, होर्डिंग्ज नकोत
वाहतूक परीचलनाच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या शहरातील वाहतूक बेटांवर सर्व बाजूंनी फलक लावण्यात आल्याचे दिसून येते. या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच, शहर विद्रूप दिसते. या वाहतूक बेटांवर कोणत्याही स्थितीत फलक, होर्डिंग्ज लागणार नाहीत याची दक्षता सर्व सहायक आयुक्त यांनी घ्यावी, अशा सुचना बांगर यांनी बैठकीत दिल्या आहेत.