डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंंबिवली भागात वैभव मंगल कार्यालयासमोरील जागेत दोन भूमाफियांनी सन २०१९ मध्ये एक बेकायदा बांधकाम पूर्ण करून, त्यामध्ये रहिवासही सुरू केला आहे. या बेकायदा इमारतीच्या भूमाफियांवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा वर्षांनी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.

शंकर ठाकुर, बीली गोढे अशी गुन्हा दाखल भूमाफियांची नावे आहेत. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या निर्देशावरून अधीक्षक अरूण पाटील यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना नियोजन आणि प्रांतिक अधिनियमाने (एमआरटीपी) कायद्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

पोलीस ठाण्यातील तक्रारीत अधीक्षक अरूण पाटील यांनी म्हटले आहे, की डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात वैभव मंगल कार्यालयासमोर ३० बाय ४५ चौरस फूटात जोत्याचे बांधकाम भूमाफिया शंकर ठाकुर आणि बीली गोढे यांनी सुरू केले होते. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये भूमाफियांना बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ह प्रभागाच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी दिले.

भूमाफियांनी पालिकेच्या नोटिसीला प्रतिसाद न देता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पालिकेत दाखल केली नाहीत की आपले म्हणणे मांडले नाही. त्यामुळे डिसेंबर २०२९ मध्ये तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी सदरचे बेकायदा बांधकाम अनधिकृत घोषित करून ते बांधकाम महिनाभरात स्वखर्चाने पाडून घेण्याचे आदेश ठाकुर, गोढे यांना दिले. तरीही पालिका अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या नोटिसीला न जुमानता शंकर ठाकुर, बीली ढोले यांनी दरम्यानच्या काळात सहा माळ्याची बेकायदा इमारत सदर जागेवर उभारली.

दरम्यानच्या कालावधीत आपण दिलेल्या नोटिसींचे काय झाले. त्या ठिकाणी बांधकाम उभे राहिले का याची कोणतीही खातरजमा पालिकेच्या ह प्रभागातील बीट मुकादम, उपअभियंता, साहाय्यक आयुक्तांनी केली नाही. त्याचा गैरफायदा घेत माफियांनी सहा माळ्याची बेकायदा इमारत उभी केली. या इमारतीमधील सदनिका २५ ते ३५ लाखाला घर खरेदीदारांना विक्री केल्या. या बेकायदा इमारतीत रहिवास निर्माण केला. या माध्यमातून पालिका, शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली.

मागील सहा वर्षाच्या काळात जोत्यापासून ते इमारत उभी राहीपर्यंत नोटिसा पाठवुनही ठाकुर, गोढे यांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता बेकायदा बांधकामांवरून न्यायालयाच्या आदेशावरून काही अधिकाऱ्यांवर संक्रांत येण्याची वेळ आल्याने घाईघाईने जुन्या बेकायदा बांधकामांच्या माफियांविरुध्द पालिकेकडून एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जात आहेत.

ठाकुर, गोढे यांनी नोटिसीचे पालन न करता कर्तव्यात कसुरी केली म्हणून अरूण पाटील यांनी दोन्ही माफियांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.