डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करुन डोंबिवलीतील ३८ भूमाफियांनी या परवानग्यांच्या आधारे पालिकेचे आरक्षित भूखंड, सरकारी जमिनी, बेवारस खासगी जमिनींवर बेकायदा टोलेजंग इमले बांधले. या बेकायदा इमल्यांना ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची’ (महारेरा) मंजुरी आहे हे दाखविण्यासाठी पालिकेच्या बनावट बांधकामांच्या आधारे ‘महारेरा’कडून इमल्यांना ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळविली. या माध्यमातून पालिका, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा अधिभारातून मिळणारा महसूल बुडविला म्हणून पालिकेने हे बेकायदा उद्योग करणाऱ्या ३८ भूमाफियांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक, कागदपत्रांची हेराफेरी कायद्याने सोमवारी गु्न्हे दाखल केले. सन २०१९ ते २०२२ या कालावधीत ही बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहेत.
पालिकेच्या साहाय्यक संचालक नगररचनाकार दीक्षा सावंत यांच्या आदेशावरुन नगररचना विभागाचे उपअभियंता प्रसाद सखदेव यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. डोंबिवली शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी असलेले बगिचे, उद्याने, शाळा, महावितरण, न्यायालये, पोलीस ठाणी, समाजमंदिर, मनोरंजन नगरी आरक्षणाचे पालिकेचे भूखंड अनेक वर्ष पडिक होते. पालिकेचे भूखंड म्हणून या आरक्षणांवर कधीही विकासक, भूमाफियांनी बेकायदा इमले कारवाईच्या भीतीने उभारले नाहीत. मागील चार वर्षाच्या कालावधीत पालिकेचे प्रमुख आपल्या हस्तकांकरवी थेट माफियांच्या संपर्कात असल्याने, या पालिका प्रमुखाला राजकीय आशीर्वाद असल्याने माफियांनी राजकीय, प्रशासकीय आशीर्वादाने पालिकेच्या भूखंडांवर बेधडक बेकायदा टोलेजंग इमारती बांधल्या.
हेही वाचा : कल्याण मध्ये क्रेडीट कार्डचा वापर करुन नोकरदाराची फसवणूक
या बेकायदा इमल्यांमधून प्रभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्त, बीट मुकादम यांनी दौलतजादा केला. या बांधकामांच्या पालिकेत तक्रारी आल्या की त्या वेळेपुरते फक्त माफियाला नोटिसा देऊन वेळकाढूपणा करण्याची कामे साहाय्यक आयुक्तांनी केली. डोंबिवली, कल्याण शहरात तुफान बेकायदा बांधकामे सुरू आहेत.या बेकायदा बांधकामांवरुन शहराचे नियोजन बिघडत चालले आहे. पालिकेच्या परवानग्या घेऊन लाखो रुपयांचा अधिभार पालिका, शासनाकडे भरुन अधिकृत इमारती बांधणाऱ्या विकासकांच्या गृहप्रकल्पांवर त्याचा विपरित परिणाम होत होता. अधिकृत प्रकल्पात ३५ ते ४० लाख रुपयांना मिळणारे घर माफिया १५ ते २५ लाखापर्यंत ग्राहकाला विकत असल्याने बेकायदा घरांकडे ग्राहकांचा सर्वाधिक ओढा आहे. या विषयीचा अभ्यास करुन ज्येष्ठ वास्तुविशारद, २७ गावातील गोळवलीचे रहिवासी संदीप पाटील यांनी दोन वर्षापूर्वी या बेकायदा बांधकामांच्या पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. त्याची दखल पालिकेने घेतली नाही. या बांधकामांना माफियांनी रेरा प्राधिकरणाची दिशाभूल करुन रेरा प्रमाणपत्र मिळविल्याने तक्रारदार पाटील यांनी महारेराकडे तक्रारी करुन या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
त्यांच्या तक्रारींची दखल पालिका आयुक्त, नगररचना विभाग, महारेरा अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी २०२१ मध्ये याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन डोंबिवली, २७ गाव परिसरात ६७ भूमाफियांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमले उभारले आहेत. त्याला रेराची मंजुरी असल्याची प्रमाणपत्रे मिळविली आहेत. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होणार असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.न्यायालयात दाखल दाव्याची प्रत आणि बेकायदा बांधकामांची तक्रार तकारदार पाटील यांनी नव्याने पालिकेत करताच साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत यांनी नगररचनाकारांना ६७ बांधकामांच्या बांधकाम परवानग्या तपासण्याचे आदेश दिले.
या तपासणीत २७ गावातील २७, डोंबिवलीतील ३८ बांधकामांना पालिकेने परवानग्या दिले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संचालक सावंत यांनी पालिकेची बनावट बांधकाम मंजुरी प्रमाणपत्रे तयार करुन त्या आधारे बेकायदा इमले बांधणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.गेल्या आठवड्यात २७ गावातील माफियांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. सोमवारी रामनगर पोलीस ठाण्यात डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील ३८ भूमाफियांवर पालिकेने गुन्हे दाखल केले. काही बेकायदा बांधकामांमध्ये काही निवृत्त, कार्यरत पोलिसांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.
गुन्हे दाखल भूमाफिया
१) अमरदीप खांडेकर, वास्तुशिल्पकार संतोष कुडाळकर, रचना आर्च (आयरे), २)मे. बाॅम्बे गोग्रास भिक्षा सोसायटी, वास्तुशिल्पकार संतोष कुडाळकर (पाथर्ली) ३) मयूर देशमुख, समर्थ बालाजी डेव्हलपर्स, वास्तुशिल्पकार मे. गोल्डन डायमेंशन (कांचनगाव) ४) आषु मंगेश, मे. वाघेश्वरी डेव्हलपर्स, वास्तुशिल्पकार एस. डी. ओक, सामी असोसिएट (गावदेवी) ५) सरोजिनी मिश्रा, मे. आदित्य इन्फ्रा भागीदार प्रफुल्ल गोरे, स्वप्नील पाटील, वास्तु. गोल्डन आर्ट (कोपर) ६) रंगुभाई भोईर, मे. कृष्णा इन्फ्रा राममुरत गुप्ता, वास्तु. एस. डी. ओक, सामी असोसिएट (ठाकुर्ली) ७) रंगुबाई सुरेश भोईर, एस. डी. ओक (ठाकुर्ली), ८) सिता पाटील, वास्तु. मे. गोल्डन डायमेंशन (आयरे), ९) मधुकर म्हात्रे, मे, गोल्डन डायमेंशन, (शिवाजीनगर) १०) शिरीष चौधरी, मे. गुलमोहर डेव्हलपर्स, वास्तु. संतोष कुडाळकर(कांचनगाव) ११) आनंदी म्हात्रे पिंपळादेवी कन्स्ट्रक्शन, मे. गोल्डन डायमेंशन, (ठाकुर्ली) १२) सागर भोईर, रविराज पाटील, सनशाईन डेव्हलपर्स, वास्तु रचना (कांचनगाव) १३) भोलेनाथ म्हात्रे, समर्थ कृपा डेव्हलपर्स भरत गायकवाड, मे. गोल्डन डायमेंशन (शिवाजीनगर) १४) दत्तात्रय पाटील, मे. एक्सपर्ट होम कन्स्ट्रक्शन युवराज कांबळे, मे. गोल्डन डायमेंशन (आयरे),
१५) दिगंबर म्हात्रे, डी. व्ही. इन्फ्रादिनेश सुतार, वास्तुरचना (शिवाजीनगर) १६) लक्ष्मीबाई पवार, मे. ओम साई डेव्हलपर्स, मयूर वारेकर, वास्तुरचना (गावदेवी) १७) गणेश भोईर साई डेव्हलपर्स, वास्तु. चंद्रशेखर भोसले (आयरे) दिनकर म्हात्रे, सुनील मढवी, मे. गोल्डन डायमेंशन (आयरे) १९) समर्थ डेव्हलपर्स, सखाराम केणे, अक्षय सोलकर, वास्तुरचना (आयरे) २०) मनोहर पाटकर, गावदेवी कन्स्ट्रक्शनचे जयंता मोरे, मे. गोल्डन डायमेंशन (शिवाजीनगर) २१) स्वामी समर्थ एन्टरप्रायझेस, अनिल केणे, वास्तु रचना (आयरे) २२) गौतम माळी गौतम एन्टरप्रायझेस, वास्तुरचना (आजदे), २३) आनंदा म्हात्रे साईकृपा डेव्हलपर्स, वास्तुरचना (ठाकुर्ली), २४) सोपान पाटील, तुळजाभवानी डेव्हलपर्स, प्रमोद पाटील, वास्तुरचना (शिवाजीनगर) २५) बाळाराम भोईर, गोविंद माल्या, गोल्डन डायमेंशन, (ठाकुर्ली) २६) आदित्य इन्फ्रा नीलेश गुरव, देवचंद कांबळे, सामी असोसिएट(आयरे) २७) स्पर्सिका डेव्हलपर्स अजिंक्य नारकर, पांडुरंग म्हात्रे, वास्तुरचना (शिवाजीनगर) २८) सिध्दार्थ म्हात्रे, भवानी डेव्हलपर्स सुनील यादव, सामी असोसिएट (कोपर) २९) मे. रुद्र इन्फ्रा, रजन राजन, गोलर्न आर्ट, सुलोचना केणे ३०) सिध्दीविनायक डेव्हलपर्स, राजेश पाटील, वास्तु. जी. एन. गंधे (नवागाव) ३१) श्री एन्टरप्रायझेस भास्कर चौधरी, उदय पाटील (कांचनगाव)३२) प्रदीप तरे साईज्योत एन्टप्रायझेस, मंजुळा भोईर, वास्तु रचना (नवागाव) ३३) गणेश डेव्हलपर्स अविनाश म्हात्रे, धर्मेंद्र सिंग, चंद्रभागा भोईर ३४) आर. एम. जी. एन्फ्रा राजेश राम, प्रदीप ठाकूर, वास्तुरचना (नवागाव), ३५) प्रशांत माळी, आशन डेव्हलपर्स, लक्ष्मण केणे, वास्तरचना (आयरे) ३६) गोरक्षनाथ एन्टरप्रायझेस किरण घुले, अनंता पाटील, वास्तुरचना (आयरे) ३७) अनुसया चौधरी, गोल्डन डयमेंशन (कांचनगाव) ३८) डिलक्स होम सचीन तळेकर, प्रल्हाद पाटील, वास्तु. प्रमोद कांबळे (कांचनगाव).