डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील २७ गावांमधील गोळवली, दावडी येथे बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण पाच जणांच्या विरुध्द महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ३९७ (क) (एमआरटीपी) प्रमाणे मंगळवारी फौजदारी गुन्हे दाखल केले. या कारवाईने बेकायदा बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक शंकर नारायण जाधव यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.

अधीक्षक शंकर जाधव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की २७ गावातील मौजे गोळवली येथे सचिन शेलार, राम कुमकर आणि इतरांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारल्याची तक्रार आय प्रभागात दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकामधारकांना बांधकामांचा परवानगीची कागदपत्रे आय प्रभागात सादर करण्याच्या नोटिसा गेल्या महिन्यात दिल्या होत्या. बांधकामधारकांनी इमारत बांधकामाची कागदपत्रे सादर केली नाहीत. गेल्या आठवड्यात साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी शेलार, कुमकर यांचे सात माळ्याच्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत घोषित करून हे बांधकाम स्वताहून तोडून घेण्याचे आदेश दिले होते. इमारत स्वताहून तोडून न घेतल्याने अधीक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून बांधकामधारक शेलार, कुमकर आणि इतरांविरुध्द एमआरटीपीचा फौजदारी गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

दुसऱ्या एका प्रकरणात, मौजे दावडी येथे ऐश्वर्या बंगल्याच्या बाजुला घर मालक चंदन कुर्मी, विनोद बुरई, कैलास सिंंग यांनी मूळ घरावरील पत्रे काढून ऐश्वर्या बंगल्याला खेटून आर. सी. सी. पध्दतीने दोन वर्षापूर्वी बेकायदा बांधकाम केले. या विषयीच्या तक्रारी प्राप्त होताच घर मालक चंदन कुर्मी आणि इतरांना या बांधकामाच्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस तत्कालीन अधिकाऱ्यांनी बजावली होती. घर मालक कुर्मी यांनी बांधकामाची कागदपत्रे पालिकेत सादर केली नाहीत. सुनावणीलाही ते हजर राहिले नाहीत. साहाय्यक आयुक्त पवार यांनी कुर्मी यांचे बांंधकाम अनधिकृत घोषित करून ते स्वताहून पाडून घेण्याची नोटीस घरमालकाला बजावली होती. बांधकाम पाडून न घेतल्याने अधीक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरमालक चंदन यांच्यासह विनोद, कैलास यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला.

साहाय्यक आयुक्त पवार यांनी प्रभागातील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द एमआरटीपीचे गुन्हे दाखल करून ती बांधकामे पालिकेच्या अभिलेखावर आणून पाडकामाचे नियोजन केले आहे.

गोळवली, दावडी येथील दोन्ही बांधकामधारकांनी बांधकामाची कागदपत्रे पालिकेला सादर केली नाहीत. ही बांधकाम अनधिकृत घोषित केल्यानंतरही ती स्वताहून तोडून घेतली नाहीत. त्यामुळे बांधकामधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. ही बांधकामे जमीनदोस्त करण्याचे नियोजन लवकरच केले जाईल.- भारत पवार, साहाय्य आयुक्त,आय प्रभाग.

Story img Loader