कल्याण – कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील माणेरे गाव हद्दीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता सात बेकायदा चाळींच्या माध्यमातून ९२ खोल्यांची बांधकाम करणाऱ्या पाच भूमाफियांवर पालिकेच्या आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी महाराष्ट्र प्रांतिक प्रादेशिक नगररचना अधिनियम (एमआरटीपी) आणि भारतीय न्याय संहिता कायद्याने गुन्हा दाखल केला.

बाळकृष्ण कान्हा भोईर, जयेश बाळकृष्ण भोईर, रमेश वंडार भोईर, मुकेश शालिक जोशी, अमर घनसोळकर अशी बांधकाम करणाऱ्या भूमाफियांची नावे आहेत. कल्याण पूर्वेतील अंबरनाथ तालुक्यातील माणेरे गाव हद्दीतील सर्व्हे क्रमांक ५७ हिस्सा क्रमांक दोनवर ३४ गुंठ्याच्या भूक्षेत्रावर त्यांनी बेकायदा चाळींची बांधकाम केली आहेत. या बेकायदा बांधकाम प्रकरणी याच गावातील एकनाथ भोईर यांनी आय प्रभाग कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीप्रमाणे उपअभियंता संतोष ठाकुर यांनी माणेरे गावात जाऊन घटनास्थळीची पाहणी केली. जागृती काॅलनी नावाने बी. के. नगर भागात चार बेकायदा चाळी बाळकृष्ण, जयेश, मुकेश, रमेश, अमर यांनी बांधल्याचे चौकशीत पुढे आले होते.

या बेकायदा बांधकामप्रकरणी आय प्रभागाच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी बांधकाम परवानगी, जमीन मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यासाठी बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. भूमाफियांनी पालिकेत कागदपत्रे सादर केली नाही. सुनावणीला हजर राहिले नाहीत. साहाय्यक आयुक्तांनी ९२ खोल्यांची बेकायदा बांधकामे अनधिकृत घोषित करून तीन दिवसात स्वताहून पाडून टाकण्याची नोटीस दिली होती. त्याचीही दखल भूमाफियांनी घेतली नाही. दरम्यानच्या काळात या बेकायदा चाळींमधील खोल्या भूमाफियांनी घर खरेदीदारांना विकल्या.

विहित प्रक्रिया पूर्ण करूनही माणेरे गावातील ९२ बेकायदा खोल्यांचे भूमाफिया बांधकामाची कागदपत्रे सादर करत नाहीत. बांधकामे स्वताहून तोडून घेत नसल्याने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अधीक्षक नितीन चौधरी यांच्या साहाय्याने भूमाफियांविरुध्द एमआरटीपीचा गु्न्हा दाखल केला.

काही दिवसापूर्वीच साहाय्यक आयुक्त पवार यांनी चिंचपाडा भागातील मे. राम डेव्हलपर्ससचे भागीदार शिवकुमार मिश्रा, सागर मिश्रा, बाळाराम काळु म्हात्रे यांच्या विरुध्द एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.

आय प्रभाग हद्दीतील सर्व नवीन बेकायदा बांधकामांंवर तोडकामाची कारवाई करून त्यांच्यावर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. नव्या, जुन्या अशा सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करून संबंधितांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दर आठवड्याला भूमफियांविरुध्द चार ते पाच गुन्हे दाखल करण्याचे नियोजन आहे.-भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण पूर्व.

Story img Loader