कल्याण : १४ गुन्हे दाखलअसलेला, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दहशत पसरविणारा भिवंडीतील कुख्यात गुन्हेगार सुजित पाटील उर्फ तात्या याच्यासह त्याच्या २६ समर्थक भाईंना येथील खडकपाडा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्याला अटक केली होती. त्यानंतर त्याचा मुक्काम आधारवाडी तुरुंगात होता. गुरुवारी (ता. २७) तात्याची आधारवाडी तुरुंगातून सुटका होणार असल्याने त्याच्या ‘भाई’ समर्थकांनी चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन भाईच्या स्वागताची जोरदार तयारी आधारवाडी कारागृहाबाहेर केली होती.
गुन्हेगार तात्याच्या हुल्लडबाज भाई समर्थकांमुळे आधारवाडी तुरुंगाबाहेरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तुरुंगातून तात्या मोठा पराक्रम करून बाहेर येणार असल्याचा थाट तात्या समर्थकांचा होता. महागड्या चारचाकी गाड्या तात्याला घेण्यासाठी आधारवाडी कारागृहाबाहेर भाई मंडळींनी आणल्या होत्या. तात्या सुटणार म्हणून घोषणाबाजी, जल्लोषाचे वातावरण आधारवाडी तुरुंगाबाहेर होते.भाई समर्थकांच्या वाहनांचा प्रवाशांना त्रास होत होता. त्याची फिकीर तात्या समर्थकांना नव्हती. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या गोपनीय गस्ती पथकाला आधारवाडी तुरुंगाबाहेर काही भाई लोक महागड्या गाड्या घेऊन आले आहेत. त्यामुळे तुरुंगाबाहेरील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे असे समजले. या सर्व गाड्या भिवंडीतील गुन्हेगार सुजित पाटील उर्फ तात्या आधारवाडी तुरुंगातून सुटणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी आल्या आहेत असे पोलिसांना समजले.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांना ही माहिती समजली. उपायुक्त झेंडे यांच्या आदेशावरून डाॅ. वाघमोडे, पोलीस निरीक्षक संतोष शिवले पोलीस पथकासह आधारवाडी तुरुंगाबाहेर दाखल झाले. त्यांनी सर्व तात्या समर्थक भाईंना तुरुंग प्रतिबंधित क्षेत्रात गर्दी केली. मनाईचा आदेश भंग केला. वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा केला म्हणून ताब्यात घेतले. तुरुंगातून सुजित पाटील उर्फ तात्या बाहेर येताच त्यालाही पोलिसांनी २६ समर्थकांसह ताब्यात घेतले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन वर्षापूर्वी पुणे येथील गुंड गजा मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याची त्याच्या समर्थकांनी हुल्लडबाजी करत, रहदारीला अडथळा करत वाजतगाजत मिरवणूक काढली होती. तसाच प्रकार गुरुवारी आधारवाडी कारागृहाबाहेर होणार होता. खडकपाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे तो प्रकार टळला.
बीड हत्येसारखा प्रकार भिवंडी शहर परिसरात होऊ नये म्हणून या भागात प्रचंड दहशत असलेल्या एका गुंडाला पोलिसांनी अटक करावी म्हणून भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी गेल्या महिन्यात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या घटनेनंतर भिवंडी पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी सुजित पाटीलला इगतपुरी येथून अटक केली होती.आधारवाडी तुरुंगाबाहेर सुजित पाटील सुटणार असल्याने त्याच्या समर्थकांनी अनेक वाहने त्याला नेण्यासाठी आणली होती. यामुळे वाहतूक कोंडी तुरुंगाबाहेरील रस्त्यावर झाली होती. प्रतिबंधित क्षेत्रात हुल्लडबाजी केल्याने सुजित पाटील याच्यासह २६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कल्याणजी घेटे साहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण.