क्रिमसन रोझ हे स्वॅलोटेल कुळामधील एक मोठय़ा आकाराचे फुलपाखरू आहे. स्वॅलोटेल कुळातील फुलपाखरांना स्वॅलो म्हणजे पकोळीला असते. तशी लांबट शेपटी असते. अर्थात याला अपवादही आहेत. पण क्रिमसन रोझची शेपटी अगदी नजरेत भरल्यासारखी असते. या फुलपाखरांच्या पुढच्या पंखांची (फोर विंग) वरची बाजू ही वेलवेटसारख्या काळ्या रंगाची असते. या काळ्या रंगावर पंखाच्या टोकाला थोडी जागा सोडून आणि अगदी मध्यावर पांढऱ्या जाडसर ठिपकांचा एक उभा पट्टा असतो. या फुलपाखरांच्या मागचा पंखही वेलवेटी काळ्या रंगाचा असतो. यावरती मोराच्या पिसांवर असतात तसे गडद लाल रंगाचे ठिपके असतात. मागच्या पंखाच्या टोकाला शेपटीसारखे टोक बाहेर आलेले असते. नर आणि मादी दोघांचेही रूप जवळजवळ सारखेच असते.
क्रिमसन रोझची मादी बकवेल आणि त्या कुळामधील (अरिस्टोलाकी असते) झाडांवर अंडी घालते. या झाडांच्या पानांमध्ये अल्कलाइड्स ही विषारी द्रव्ये असतात. ही द्रव्ये शरीरात गेल्यामुळे ही फुलपाखरंसुद्धा विषारी आणि म्हणून खाण्यास अयोग्य बनतात. आपलं हे विषारीपण ही फुलपाखरं गडद रंगाच्या माध्यमातून दिमाखात मिरवतात. त्यांचं उडणंही त्यामुळेच संथ असतं. भक्षक या गडद रंगांच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या वाटेला जात नाहीत. यामुळेच कॉमन मॉरमॉन फुलपाखराची मादी, क्रिमसन रोझ फुलपाखरांसारखं रूप घेऊन भक्षकांना चकवण्याचा प्रयत्न करते.
ही फुलपाखरं संपूर्ण भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतात. त्यातही सह्य़ाद्री म्हणजे याचं हक्काचं आश्रयस्थान. पावसाळ्यात आणि त्यानंतर सगळीकडे हमखास दिसणारी ही फुलपाखरं उन्हाळ्यात मात्र समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणाचा आसरा शोधतात. तशी ही जंगलांमध्ये आणि मोकळ्या कुरणांवर आणि अगदी शहरांमधल्या बागेत अशा सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. ही फुलपाखरं सहसा जमिनीजवळच उडणं पसंद करतात. आणि फार तर १० मीटर उंचीपर्यंत उडतात. या फुलपाखरांचा अंडी या अवस्थेपासून प्रौढ फुलपाखरू कोषामधून बाहेर पडण्यापर्यंतचा काळ साधारणत: ४५ दिवसांचा असतो. लँटेना कमारा म्हणजे टवटवी किंवा जाणेदीची फुलं या फुलपाखरांना फार आवडतात. त्यातील जेवढा जास्त मध माद्यांना मिळेल तेवढय़ा जास्त प्रमाणात त्या अंडी घालतात.
या फुलपाखरांमध्ये स्थानिक स्थलांतर करण्याची सवयही पाहायला मिळते.