लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण डोंबिवलीत जी संथगती रस्ते विकास कामे सुरू आहेत. या कामांमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या कामांवरुन लोकांचे लक्ष वळविण्यासाठी शिवसेना-भाजपने एका पोलीस अधिकाऱ्याचे निमित्त करुन लोकसभा उमेदवारीवरुन नाटक सुरू केले आहे, अशी टीका मनसे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सोमवारी येथे केली.
कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार असेल. हा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजप एकजुटीने काम करतील. आता हे भांडत असले तरी निवडणुका आल्या की यांची युती होईल, असे आ. पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा… दिव्यातील निधी पेरणीतून मनसे आमदार राजू पाटलांची कोंडी
एका पोलीस अधिकाऱ्यावरुन एवढे मोठे प्रकरण करण्याचे कारण नाही. गृहमंत्री पद भाजपकडे आहे. या अधिकाऱ्याची बदली भाजप कोठेही करू शकते. फक्त मूळ विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना-भाजपने हा वाद निर्माण केला आहे. एकाच थाळीमधील हे चट्टे बट्टे आहेत. लोकांचे मूळ विषयावरुन लक्ष विचलित करण्याचे यांचे काम सुरू आहे. लोकांनी यांच्या कामावर लक्ष केंद्रीत केले तर या लोकांना मोठी किमत चुकवावी लागेल. यापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर एक हाती मोठी विकास कामे आणून शहरात ओतली. ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. आता पावसाळा सुरू होईल. त्यावेळी या रस्त्यांची काय अवस्था होईल.
हेही वाचा… डोंबिवली पश्चिमेतील गणेश चौकात वाहतूक कोंडी, वाहतूक पोलीस तैनात करण्याची रिक्षा संघटनेची मागणी
शाळांच्या बस या रस्त्यांवरुन जाणार आहेत. मुलांना त्याचा किती त्रास होईल याचा कोणी विचार करत नाही. चालू काँक्रीट रस्त्यांना पर्यायी चांगले रस्ते नाहीत. आहेत त्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या सगळ्या विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे नको ते विषय उकरुन काढण्यात आले आहेत. निवडणुका येऊन द्या सेना-भाजपची युती होईल. शिवसेनेचा खासदार कल्याण लोकसभेत निवडून येईल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला. आ. पाटील यांनी विकास कामांच्या विषयावरुन शिवसेना-भाजपला लक्ष्य केल्याने आता भाजप, शिवसेना विरुध्द मनसे असा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.