उल्हासनगरः देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून विकासकामांना प्राधान्य दिले जात असले तरी विरोजक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात असून रेल्वेच्या नुकत्याच झालेल्या अपघातानंतरही विरोधकांकडून केले जाणारे राजकारण दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीनिमित्त उल्हासनगरात ठाकूर आले असताना त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
राज्यभरातील लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना वाढवण्यासाठी भाजपच्या वतीने प्रयत्न केले जात असून नुकतेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर शहरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शहरातील पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. उल्हासनगर कॅम्प तीन येथे असलेल्या शहिद अरूणकुमार वैद सभागृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या कामांचा पाढा वाचला. केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा… ठाणे: आव्हाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधी समाजाचा कोपरी बंद
गरिब कल्याणापासून रोजगार, उद्योग, महिला, तरूण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी अशा प्रत्येक घटकासाठी सरकार काम करत आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली असून देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असून त्यात महाराष्ट्राचेही योगदान मोठे असल्याचेही यावेळी ठाकूर म्हणाले. असे असले तरी विरोधक मात्र राजकारण करण्यात व्यस्त आहेत. रेल्वे अपघातातही विरोधकांनी केलेले राजकारण दुर्दैवी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
आव्हाडांनी माफी मागावी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समुदायाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना अनुराग ठाकून यांनी आव्हाड यांना तात्काळ सिंधी समाजाची माफी मागावी असे आवाहन केले. कल्याण लोकसभा मतदारसंघात वाढत्या भाजप नेत्यांच्या दौऱ्याबाबत विचारले असता आम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. जागावाटप हा वरिष्ठांचा विषय असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.