ठाणे : वर्तकनगर येथील वेदांत गृहसंकुलात मगर दिसून आल्याची घटना रविवारी मध्यरात्री उघडकीस आली. मगर आल्याची माहिती मिळताच वन्यजीव प्रेमींकडून या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र पाच तास उलटून गेल्यानंतही मगर काही दृष्टीस पडली नसल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील वेदांत फेज-२ गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढले असून त्यात नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संकुलाच्या मागील बाजूने एक नाला वाहतो. हा नाला मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत होता. येऊरच्या जंगलातून येणाऱ्या या नाल्यातूनच ही मगर गृहसंकुलात आली असेल आणि पुन्हा ती नाल्यात परत गेली असेल, असा अंदाज वन्यजीवप्रेमींकडून वर्तवण्यात आला आहे.

वर्तकनगर येथील वेदांत गृहसंकुलात राहणारे एक रहिवासी रात्री कामावरून घरी परतत होते. रविवारी मध्यरात्री त्यांना संकुलातील बी-४ इमारतीच्या समोरील भागात असणाऱ्या एका झाडाच्या कठडय़ाजवळ मगरीची शेपटी दिसली. त्यांनी ताबडतोब शेपटीचे छायाचित्र काढले. त्यानंतर काही वेळाने ती मगर संकुलातील वाहनतळाच्या दिशेने गेली. या घटनेची माहिती संकुलातील नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस आणि वनविभागाला संपर्क साधला. वनविभागाच्या वतीने वाईल्ड लाईफ वेलफेअरचा समूह संकुलात शोधमोहिमेसाठी दाखल झाला. मात्र पाच तास शोध घेऊनही मगर निदर्शनास आली नाही. पुन्हा दोन तासांनी समूहाने संकुलाच्या सर्व परिसरात मगरीचा शोध सुरू केला. मात्र मगर दिसून आली नसल्याचे वाईल्ड लाईफ वेलफेअर असोशिएशनच्या आदित्य पाटील याने सांगितले. या पाश्र्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने संकुलात वावरताना नागरिकांनी त्यांच्या स्वतच्या ज्ीिवाची आणि त्यांच्या पाल्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वेदांत फेज-२ गृहसंकुलाच्या समितीतर्फे पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.