डोंबिवली- ‘तुमच्या पूर्वजांना सद्गती मिळालेली नाही. ते अतृप्त आहेत. ते अतृप्त आत्मे तुमच्या घरात अदृश्य स्वरुपात फिरत आहेत. या अदृश्य शक्तींपासून तुमच्या जीवाला खूप धोका आहे,’ अशी भीती एका वृध्दाला एका भोंदू महिला आणि तिच्या जोडीदारणीने घातली. घरातील ही अदृश्य शक्ती हटविण्यासाठी जादुटोणा करण्यासाठी  वृध्दाला बाहेर पाठविले. या कालावधीत त्यांच्या घरातील १५ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज दोन्ही भोंदू महिलांनी लुटून नेला. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी वृध्दाने तक्रार करताच पोलिसांनी भोंदू महिलेला अटक केली. तिच्या साथीदार महिोचा पोलीस शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<< डोंबिवली, कल्याण, आसनगाव रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी छतावरुन थेट फलाटांवर

प्रिया उर्फ त्रिशा कुणाल केळुसकर (२६, रा. आर्चिड एफ, ९०५, क्राऊन प्लाझा, तळोजा रोड, खोणी, डोंबिवली), मरियम उर्फ सेहनाझ शेख (रा. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत. या भोंदू मांत्रिक महिलेकडून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व इतर महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले, वसंत गंगाराम समर्थ (७९, रा. ऑरेलिया, पलावा फेज 2, खोणी, डोंबिवली) यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. नोकरी निमित्त मुलगा परदेशात असतो. घरात एकटेच राहत असल्याने वसंत समर्थ यांनी स्वयंपाक करण्यासाठी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या त्रिशा केळुसकर या तरुणीला दरमहा वेतनावर काम दिले होते. या तरुणीने वसंत यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेतला. वसंत यांना ‘तुमच्या घरावर कुणीतरी करणी केली आहे. एक अदृश्य आत्मा तुमच्या घरात फिरत आहे. या आत्म्यापासून तुमच्या जीवाला धोका असून तुमच्यावरील संकट मी मांत्रिकी करून दूर करीन, असे सांगितले. हा प्रकार ऐकून वसंत समर्थ घाबरले.

हेही वाचा <<< ठाणे जिल्ह्यातील जनावरांचा बाजार आणि शर्यती बंद ; जिल्ह्यातील लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

ही मांत्रिकी पार पाडण्यासाठी तुम्हाला पूजेसाठी खर्च, लोकांना जेवण देण्यासाठी भोजनावळ खर्च, दक्षिणा असा खर्च करावा लागेल, असे त्रिशाने वसंत यांना सांगितले. त्यांनी खर्च करण्याची तयारी दर्शवली. जवळील सोन्याचा ऐवज विश्वासाने त्रिशाच्या ताब्यात दिला. घरातील अदृश्य शक्ती हटविण्यासाठी तुम्हाला एक दिवस तुमच्या दुसऱ्या घरी जाऊन राहावे लागेल असे सांगितले. या कालावधीत मी तुमच्या घराची शांती करू घेते. मी निरोप दिला की तुम्ही परत या, असे सांगितले. ठरल्या प्रमाणे वसंत समर्थ दुसऱ्या घरी जाताच त्यांच्या घराची चावी त्रिशाकडे असल्याने तिने एक दिवस येऊन वसंत यांच्या घरातील भांडी, किमती सामान मरियम हिच्या साथीने लुटून नेले.

एक दिवस बाहेर काढुनही त्रिशा फोन करत नाही. तिचा फोन लागत नाही. म्हणून वसंत समर्थ एक दिवस स्वताहून आपल्या घरी आले. त्यावेळी त्यांना धक्का बसला. घरात किराणा सामानासह सर्व साहित्य लटून नेण्यात आले होते. त्रिशाचा फोन लागत नव्हता.ती घरी नव्हती. त्रिशानेच आपला विश्वासघात करुन हा प्रकार केल्याचा संशय आल्याने वसंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपास करुन त्रिशाला अटक केली. महाराष्ट्र नरबळी, जादुटोणा, अघोरी प्रथा कायद्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crooked woman robbed old man 15 lakhs incident khoni palava near dombivli ysh