जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत महिला बचत गटांकडून चालविल्या जाणाऱ्या लघु उद्योगांची भूमिका महत्वाची असते. करोना काळात या महिला बचत गटांचे आर्थिक गणित कोलमडून पडले होते. ग्रामीण भागातील अनेक महिलांचे उदरनिर्वाहाचे साधन हे बचत गटांमार्फत चालविले जाणारे विविध लघु उद्योग आहेत. यामुळे बचत गटांचे आर्थिक चक्र पुन्हा रुळावर यावे याकरिता जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आर्थिक वर्षात ३ हजार ३९६ बचत गटांना तब्बल १०० कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज स्वरूपात आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. या मोठ्या आर्थिक पाठबळामुळे जिल्ह्यातील शेकडो बचत गटांना एक उभारी मिळाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला बचत गटांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १० हजार ६०८ महिला बचत गट कार्यरत असून एक लाखांहून अधिक महिला या बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. या महिलांसाठी शासनातर्फे राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियाना अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत महिलांना विविध लघु उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. तसेच हे लघु उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना शून्य टक्के व्याज दरावर कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. मागील वर्षभरात जिल्ह्यातील ३ हजार ३९६ बचत गटांना विविध लघु उद्योग सुरु करण्यासाठी उमेद अभियाना अंतर्गत तब्बल १०० कोटी ५३ लाख रुपयांचा पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक बँका, खासगी, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमार्फत बचत गटांना हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच या बचत गटांतील बहुतांश महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांचे बँकेचे व्यवहार अडकून राहू नयेत याकरिता त्यांच्यासाठी बँक सखींची देखील नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ या तालुक्यांत एकूण ९७ बँक सखी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून दिले जाणारे आर्थिक पाठबळ आणि बँक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी मिळणारी बँक सखींची मदत यामुळे जिल्ह्यातील महिला बचत गट नव्याने उभारी घेताना दिसून येत आहेत.
बचत गटांतर्फे सुरु असलेले लघु उद्योग
गतवर्षी उपलब्ध झालेल्या कर्जाचा वापर करून बचत गटांतील महिलांतर्फे भाजीपाला लागवड, भातशेती, फुलशेती, समूहशेती करण्यात आली. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणे. त्याचबरोबर अनेक महिलांकडून लोणची पापड, मसाले बनविणे तसेच विविध खाद्यपदार्थांची विक्री करणे यांसारखे लघु उद्योग सुरु करण्यात आले. तर काही गटांतर्फे किराणा दुकान चालविणे, गणपतीची मूर्ती बनविणे, मातीच्या वस्तू बनविणे, बांबूपासून विविध वस्तू बनविणे, कापडी पिशव्या बनविणे, शिवण व्यवसाय, बाटिक प्रिटींग करणे, केक बनविणे, पणती, अगरबत्ती तयार करणे यांसारखे उद्योग सुरु करण्यात आले आहे. यातून महिलांचे उत्तम अर्थार्जन होत आहे.
बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना लघु उद्योगाच्या विस्तारासाठी तसेच काहींना नव्याने उद्योग सुरु करण्यासाठी हे आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नतीच्या उमेद अभियान अंतर्गत हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामुळे हजारो बचत गटांना एक उभारी मिळाली आहे.-छायादेवी सिसोदे, अभियान सहसंचालक, ठाणे