ठाणे : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कौपीनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने अति महत्वाच्या व्यक्तींसह नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कौपीनेश्वर मंदिर समितीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी विशेष नियोजन आखले आहे. गर्दी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेत मंदीरातील दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, अपंग, तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती असे चार प्रवेशद्वार उभारले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौपीनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत वसलेले आहे. त्याच्या मागील बाजुस मासुंदा तलाव आहे. तर दुसऱ्या बाजुस भाजी मंडई आहे. या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. मराठी नव वर्ष स्वागतासाठी या मंदिर समितीकडून स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते. या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळी दर्शनासाठी येत असतात. तसेच महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कौपीनेश्वर मंदिर समितीने विशेष नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कौपीनेश्वर मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यातील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदीरात भाविकांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री कौपिनेश्वर मंदिर समितीकडून दरवर्षी विशेष खबरदारी घेतली जाते. यंदाही अशाचप्रकारे गर्दीचे विभाजन करण्यासाठी समितीने नियोजन आखले आहे. ठाण्याची मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई आणि मासुंदा तलाव अशा चहुबाजुने गर्दीच्या परिसरात वसलेल्या या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या गर्दीचे विभाजन केले जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, अपंग, तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असे चार प्रवेश द्वार तयार करण्यात आलेले असून या मार्गामधून मंदीरात दर्शनासाठी जाण्याचा आणि तेथून बाहेर पडण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

असे आहे नियोजन

कौपीनेश्वर मंदिरात दर्शनासाठी चार प्रवेशद्वार असणार आहे. बाजारपेठेतील मुख्य प्रवेशद्वार (नंदी जवळील)  येथून सर्व स्त्री, पुरूषांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर, दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर जाण्यासाठी दक्षिणमुखी मारूती जवळील प्रवेशद्वाराचा वापर भाविकांना करता येणार आहे. त्याचप्रमाणे भाजी मंडईजवळील प्रवेशद्वार हा ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, गरोदर महिला, अपंग व्यक्ती यांच्यासाठी खुला असणार आहे. या प्रवेशद्वारातून ओळखपत्र दाखवून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तर मासुंदा तलावाजवळील प्रवेशद्वार हे महत्वाच्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच येथून वाहनांनाही प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे शिवलिंग

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात कौपिनेश्वर मंदिर वसले आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे आणि १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आहे. ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ. स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले. या मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत.