लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांनी ओथंबणाऱ्या सामान्य लोकलमधून नियमित प्रवास करणाऱ्या बहुतांशी प्रवाशांनी मागील काही दिवसांपासून रेल्वे पास, तिकीट काढून कल्याण ते सीएसएमटी वातानुकूलित लोकलने प्रवास करणे सुरू केले आहे. या गर्दीत बदलापूर, टिटवाळा, कल्याण ते ठाणे दरम्यान सामान्य लोकलचे अनेक ‘फुकटे’ प्रवासी घुसत असल्याने वातानुकूलित लोकलमधील गारेगार प्रवासाचा आनंद नियमितच्या प्रवाशांना घेता येत नाही.
उन्हाचा चटका वाढल्यापासून सामान्य लोकलने नियमित प्रवास करणारे प्रवासी सकाळच्या वेळेत कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकलने प्रवास करू लागले आहेत. सामान्य लोकलमध्ये चढताना होणारी दमछाक, त्यात घामाच्या धारा. त्यामुळे कार्यालयात जाईपर्यंत कपडे, अंग घामांनी निथळून गेलेले असते. हा त्रास कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली परिसरातील सामान्य लोकलचे बहुतांशी प्रवासी रेल्वे पास, तिकीट काढून वातानुकूलित लोकलने प्रवास करू लागले आहेत.
आणखी वाचा- ठाणे: घोडबंदरमधील ३० गृहसंकुलात पाण्याचा ठणठणाट
मागील वर्षभरापासून वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उन्हाचे चटके वाढू लागले की सामान्य लोकलने प्रवास करणारे अनेक प्रवासी या लोकलने पाऊस सुरू होईपर्यंत प्रवास करतात. वातानुकूलित लोकलमधील नियमितचे प्रवासी त्यात एप्रिल, मे या दोन महिन्यात होणाऱ्या सामान्य लोकलचे प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास सुरू करतात. त्यामुळे गारेगार लोकलमध्ये आता तुफान गर्दी होत आहे.
तपासणीसांची पाठ
या गर्दीत घुसून तिकीट तपासणी करताना तिकीट तपासणीसांना कसरत करावी लागते. त्यामुळे तिकीट तपासणीस सकाळच्या वेळेत वातानुकूलित लोकलमध्ये येत नाहीत. याचा अनुभव आणि अंदाज असल्याने अनेक फुकटे, सामान्य लोकलचा पास, तिकीट असलेले प्रवासी अंगाची उन्हाने होणारी काहिली शमविण्यासाठी वातानुकूलित लोकलने बिधनधास्त प्रवास करतात. हे बहुतांशी फुकटे प्रवासी बदलापूर, टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली दरम्यानचे असतात आणि ते ठाणे, घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरतात. पुढील रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट तपासणीसांची भीती या प्रवाशांना असते, असे वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत कल्याण, ठाणे, घाटकोपर रेल्वे स्थानकापर्यंत वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणीस कर्तव्य करतील यादृष्टीने आदेश काढावेत. रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस असले तरी वातानुकूलित लोकलमध्ये ते गर्दीमुळे चढत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
आणखी वाचा- डोंबिवलीत रात्रीच्या वेळेत पाण्याची चोरी, शेकडो लीटर पाणी फुकट
वातानुकूलित लोकलमधून नियमित, रेल्वे पास, तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखासिन प्रवास करण्यासाठी आणि वातानुकूलित लोकलमधील फुकट्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी तिकीट तपासणीसांनी नियमित किमान सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वातानुकूलित लोकलमधून प्रवास करुन तिकीट तपासणी करावी. यामुळे फुकट्या प्रवाशांची या लोकलमधील घुसखोरी थांबेल असे प्रवाशांनी सांगितले. बहुतांशी फुकटे प्रवासी हे बदलापूर, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात चढतात. ठाणे स्थानकात सकाळच्या वेळेत तिकीट तपासणीसांची वर्दळ नसल्याने ते आरामात रेल्वे स्थानका बाहेर पडतात. सामान्य लोकलचे तिकीट असले तरी वातानुकूलित लोकलमधून प्रवास आपण करू शकतो, असा विश्वास या प्रवाशांना वाटू लागल्याने तो कमी करण्यासाठी तिकीट तपासणीसांनी या फुकट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
कल्याण स्थानकात रांग
वातानुकूलित लोकलमध्ये प्रत्येक प्रवाशाला आरामात चढता यावे म्हणून कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच वर प्रवासी स्वयंशिस्तीने रांग लावतात. वातानुकुलित लोकल आली की रांगेत लोकलमध्ये चढतात. प्रत्येक डब्या समोर अशा रांगा प्रवासी लावून असतात. प्रत्येक प्रवाशाला डब्यात आरामात चढता येते. हे प्रवासी चढले की मग फुकटे डब्यात घुसतात. अनेक वेळा कल्याण रेल्वे स्थानकात फलाट सहा क्रमांकावर येणारी लोकल इतर फलाटावर आली की प्रवाशांची तारांबळ उडते. प्रवाशांचे रांगेत डब्यात चढण्याचे नियोजन फसते, असे प्रवाशांनी सांगितले.