डोंबिवली – डोंबिवली शहर परिसरातील बहुतांशी तरूण दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठागाव येथील माणकोली पुलावर दररोज रात्रीच्या वेळेत गटाने येऊन फटाके फोडत आहेत. अनेक तरूण पुलाच्या कठड्यावर उभे राहून फटाके पेटवून उंच किंवा उल्हास नदी पात्राच्या दिशेने फेकत आहेत. रात्रीच्या वेळेत या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. एखादा फटाका वाहनात घुसून काही दुर्घटना होण्याची भीती काही प्रवासी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
गटागटाने हे तरूण मोठागाव ते लोढा संकुल परिसरातील पुलाच्या कठड्यावर आपल्या दुचाकी रस्त्याच्याकडेला उभ्या करून दिवाळीचा आनंद लुटत असतात. मोठ्या आवाजाचे फटाके, उंच आकाशाच्या दिशेने जाणारी विमाने, राॅकेट पुलावरून सोडली जात आहेत. त्यामुळे पुलावर फोडण्यात आलेल्या फटाकांचा कचरा, पेटत्या सुतळी पडलेल्या आहेत. माणकोली पुलावरून दोन्ही बाजुने सुसाट वाहनांची येजा सुरू असते. त्यात काही तरूण थराररक हालचाली करत पुलावरून दुचाकी चालवित असतात. एकेका दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करत असल्याचे दृश्य या भागात दिसते. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून माणकोली पुलावर रात्रीच्या वेळेत थरारक हालचाली, रस्त्याच्या मध्यभागी फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.