प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
आसाममधील गुवाहाटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागातर्फे ‘राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी विविध राज्यांतील विद्यापीठांतून राष्ट्रीय सेवा विभागातील स्वयंसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातून या शिबिरासाठी २० स्वयंसेवकांची जिल्हास्तरावरून निवड करण्यात आली होती. जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या खर्डी महाविद्यालयातून आनंद रोज आणि कोलम बेदरकर तसेच गोवेली महाविद्यालयातून मसब जुवारी या स्वयंसेवकांची निवड राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या वतीने खर्डी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य एस. वि. देशमुख यांची स्वयंसेवकांचे प्रमुख म्हणून निवड झाली होती.
या सातदिवसीय एकात्मता शिबिरामध्ये विविध स्वयंसेवकांनी आपापल्या राज्यांतील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचबरोबर देशातील विविध भाषांची ओळख करून दिली. या शिबिरात स्वयंसेवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य शिबीर, लिंग समानता, डिजिटल इंडिया व भारताची विविधता या विषयावरील कार्यशाळा, क्रीडास्पर्धा, मोनोअॅक्ट, गायन आणि पोस्टर मेकिंग इत्यादी उपक्रम आयोजित केले होते. यावेळी मुंबई विद्यापीठातील स्वयंसेवकांनी राज्याचा ऐतिहासिक वारसा, लोकगीते व आदिवासी नृत्य सादर केले होते. देशातील विविधतेतील एकतेचे प्रदर्शन घडवून आणणे हा या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा उद्देश होता.
एकात्मक शिबिराचा समारोप आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली संस्कृती आणि भाषेमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. स्वयंसेवकांनी या गोष्टींचे अनुकरण करायला हवे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा