प्रत्येक वाद्याला स्वत:ची एक लय असते, एक ताल असतो. तबल्यावर मारलेली हलकीशी थाप किंवा सतारीच्या अलवार छेडलेल्या तारा सुमधुर नाद निर्माण करतात. तो किंचितसा ध्वनीदेखील वातावरणात भरून जातो. सुरांच्या ओढीने ठरावीक तालाचा पाठलाग करत झालेलं वादन म्हणजे अलौकिक श्रवणानंदच. अशा प्रकारे स्वत:ची वेगळी लय असलेली तीन वाद्ये एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मिलाफातून उमटणारा सूर कोणतीही मैफील स्वर्गीय उंचीवर नेऊन ठेवतो. खुल्या व्यासपीठावर सायंकाळी थंड वाऱ्याच्या साथीने या सुरलहरी हवेत पसरतात तेव्हा श्रोत्यांना संमोहित करून टाकतात. अशाच भारीत अवस्थेचा अनुभव शनिवारी ठाण्यातील आझाद नगर येथील ब्रह्मांड कट्टय़ावर जमलेल्या रसिक मंडळींनी घेतला. ख्यातनाम बासरीवादक विवेक सोनार यांनी आपल्या बासरीच्या जादूभरी स्वरांनी श्रोत्यांना गुंग केले. तर पंडित कालीनाथ मिश्रा यांचे तबला वादन आणि चारुदत्त नायगावकर यांच्या सतार वादनाने रसिकांच्या मनावर स्वरांची मोहिनी घातली.
ठाण्यातील ब्रह्मांड कट्टा या संस्थेने आठव्या वर्षांत यशस्वीरीत्या पदार्पण केले. यावेळी गंगा, यमुना आणि सरस्वती नदींचा जसा त्रिवेणी संगम होतो अगदी त्याच प्रमाणे तबला, सतार आणि बासरी या तिन्ही वाद्यांमधून स्वरांचा त्रिवेणी संगम रसिकांना ऐकायला मिळाला. वासुदेवाने बासरी वाजवण्यास सुरुवात केल्यानंतर आपोआपच मुक्या प्राण्यांपासून वृंदावनातील सारेजण बासरीचा सूर कोठून येतो आहे याचा शोध घेत असे. अगदी त्याच प्रमाणे वाद्यांची जुगलबंदी सुरू झाली आणि छोटे फुलपाखरूही स्वरांचा शोध घेत या मैफिलीत येऊन पोहचले होते.
समुद्र साऱ्यांना आपलेसे करतो त्याच प्रमाणे स्वर रसिकांना आपलेसे करत असतात. परिसरात कुठेही पारिजातकाचे झाड असल्यास पारिजातकाचा सुवास लपून राहत नाही अगदी त्याच प्रमाणे उत्तम कलाकाराची कला रसिकांपासून लपून राहत नाही. आणि ती कला ओंजळीत घेण्यासाठी तसेच ओंजळीतल्या त्या सुवासाने मन प्रसन्न व्हावे आणि त्या मनाच्या उभारीतून काहीतरी नवीन कार्य घडावे यासाठी रसिक धडपडत असतात. रसिकांनी सादर झालेल्या कलेतून जर पारिजातकाची ओंजळ भरून घेतली तर कलाकार चांगल्या रसिकांच्या नजरेतून आणि हावभावातून पारिजातकाच सुवास परत आपल्याकडेच कसा राहील याची मात्र काळजी घेतात याचा अनुभव विवेक सोनार यांनी बासरी वाजवण्यासाठी मारलेल्या फुंकरीतून सतत रसिकांना जाणवत होता.
आभा पोपलकर हिने सूर निरागस होओ या गाण्यावर कथ्थक नृत्य सादर केले. आभाच्या निरागसतेवर आपणही आज नक्कीच निरागस व्हायचं असे सुरांनी ठरविलेच असावे बहुधा असे वाटत होते. वातावरणात मिसळलेल्या सूर-तालांमुळे मधूनच वाऱ्याची एखादी हलकी झुळूक क्या बात है, असे सांगण्याचे विसरत नव्हती. विवेक सोनार यांनी सायंकाळी वाजवण्यात येणाऱ्या भुपाळी रागाने मैफिलीला सुरुवात केली. त्यानंतर ताल रूपक आणि दृत तीन ताल सादर केला. यावेळी पंडित कालीनाथ मिश्रा यांनी तबल्यावर साथ दिली. तर तानपुऱ्यावर किरण बेरोडिया यांनी साथ दिली. ज्यावेळी मध्येच विवेक सोनार यांच्या बासरीचे स्वर थांबायचे त्यावेळी कालीनाथ मिश्रा यांचा तबल्याचा ताल आणि विवेक अनंतराम यांचे बासरीचे हलकेसे स्वर वातावरण चैतन्यमय राहावे यासाठीच मदत करत होते.
सतार हे वाद्य जणू गाण्याचा आत्मा असल्याचे भास चारुदत्त नायगावकर यांच्या सतार वादनातून होत होता. यावेळी त्यांना प्रदीप साठे यांनी तबल्याची साथ दिली. शिवाय कर्तव्यासही माणूस मुकतो हे गाणे गाऊन वादकांनाही गाता येते हे रसिकांना दाखवून दिले. यावेळी चारुदत्त नायगावकर यांनी मधुवंती रागाच्या जवळ जाणारा हेमवती राग सादर केला.
त्यानंतर त्यांनी भीमपलास रागातील नैनो मे बदरा छाये, रैना बिती जाये ही गाणी सादर केली. त्यानंतर यमन रागातील परादिन जगती, चंदन साबदन तर कलावती रागातील इशारो इशारो मे दिल लेनेवाले ही गाणी सादर केली.