सांस्कृतिक शहर अशी ठाण्याची ओळख आहे. यंदाच्या विकएण्डला ही ओळख अधिक घट्ट होणार आहे. समाजात कलेची जाणीव वाढावी, कलेचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी बिग आर्ट इन्स्टिटय़ूटतर्फे २१ ते २४ जानेवारी दरम्यान भव्य चित्र प्रदर्शन, लाइव्ह पेंटिंग शो आणि कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम टाऊन हॉल, टेंभी नाका, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात हे प्रदर्शन कला रसिकांसाठी विनामूल्य खुले रहाणार आहे. शनिवार २३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ निसर्गचित्र प्रात्यक्षिक आणि दुपारी ४ ते ६ फाइन आर्ट आणि करिअरची संधी या विषयावर आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत शिल्पकला या विषयावर कार्यशाळा होणार आहे. रविवार २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत वारली चित्र प्रात्यक्षिक आणि सकाळी ११ ते २ फाइन आर्ट आणि करिअरची संधी या विषयावर मार्गदर्शन तसेच सायंकाळी ६ ते ७ या वेळेत व्यक्तिचित्र या विषयावर कार्यशाळा असे कार्यक्रम होतील. कार्यशाळांमध्ये प्रात्यक्षिकही सादर केले जाईल. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील प्रसिद्ध चित्रकारांचा समावेश आहे. त्या चित्रकारांच्या कलाकृती पाहण्याची दुर्मीळ संधी सर्व नागरिकांना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच यातील उत्कृष्ट कलाकृती या माफक दरात विक्रीस ठेवण्यात येतील.
कधी- २१ ते २४ जानेवारी वेळ- सकाळी ११ ते सायंकाळी ७.
कुठे- टाऊन हॉल, टेंभी नाका, ठाणे(प.)
आजी-आजोंबासाठी कवितांची पर्वणी
आजी, आजोबा आणि नातवंड याचे नातेच वेगळे असते. असे म्हणतात की, पाठीत घालणारे ते बाबा आणि पाठीशी घालणारे हे आजोबा असतात. उतारवयात माणसाचे मन लहान मुलांसारखे निव्र्याज होते. त्यामुळे सर्वात छोटे आणि सर्वात मोठे यांचे छान जुळते. नातवंडांबाबतीतले हेच हळवेपण ‘नातवंडांच्या कविता’ या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहोत. प्रवीण दवणे यांचे सुपुत्र आदित्य दवणे आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
कधी- रविवार, २४ जानेवारी, वेळ : सायंकाळी ५ वाजता.
कुठे- मैत्री वृद्धालय, आजदे गाव, जिमखाना रोड, डोंबिवली पूर्व
‘शाम ए गझल’
‘नाद’ संस्थेच्या वतीने गायक श्रीरंग टेंबे आणि नेहा नामजोशी आपल्या सुरांच्या माध्यमातून गझलगायक जगजीत सिंग, गुलाम अली आदी कलाकारांच्या गाजलेल्या काही दर्जेदार गझला ‘शाम ए गझल’ या कार्यक्रमात सादर होणार आहेत. जुन्या गोष्टींचा नजराणा आपल्याला जपता यावा यासाठी ‘नाद’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर ‘नाद संस्कृती परंपरेचा’ या संकल्पनेखाली त्यांनी हा सुरेल गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अथर्व कुलकर्णी तबला वाजवणार असून, हिमांशू गिंडे संवादिनी, शलाका देशपांडे व्हायोलीन, अनिल गावडे ढोलक व साइड रिदमची साथ देणार आहेत. मानसी लिमये सूत्रसंचलन करणार आहे.
कधी-शनिवार, २३ जानेवारी, वेळ : सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३०
कुठे- सहयोग मंदिर, नौपाडा, ठाणे(प.)
बर्मन पिता-पुत्रांच्या गाण्यांची मैफल
वर्षांनुवर्षे आरडी आणि एसडी बर्मन या पिता-पुत्रांच्या सुरांनी आणि आवाजाने रसिक प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आजही त्यांची गाणी जुन्या पिढीसोबत नव्या पिढीला मोहिनी घालत असते. आरडी आणि एसडींची गाणी ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. म्हणूनच अत्रे रंगमंदिर कट्टा या संस्थेतर्फे आरडी आणि एसडी बर्मन यांच्या हिंदी चित्रपटातील बहारदार गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुभाष मालेगावकर करणार असून किरण शेंबेकर, साउद शेख, मिठू मुखर्जी आणि मोना कामत-प्रभुगावकर यांच्या सुरेल आवाज रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. मंदार खराडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.
कधी- शुक्रवार, २२ जानेवारी, वेळ : रात्री ८.३०
कुठे- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण(प.)
ठाण्यात ‘सीकेपी’ बिर्यानी डे
सी.के.पी. फूड फे स्टिव्हल संपन्न झाल्यानंतर चांद्रसेनीय कायस्थ प्रभु सोशल क्लबतर्फे सी.के.पी. बिर्याणी डे साजरा करण्यात येणार आहे. सर्व सी.के.पी. खवय्यांना बिर्याणीच्या मेजवानीचा आनंद लुटता येईल. त्यानंतर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून या वेळी वेशभूषा स्पर्धा, बंदिस्त खेळ स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
कधी- रविवार २४ जानेवारी, वेळ : सकाळी १०.३० वाजता.
कुठे- सी.के.पी., सभागृह, खारकर आळी, ठाणे (प.)
विविधरंगी नृत्योत्सव
नृत्य हा कलासंस्कार शिकण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. कल्याण येथील नटराज नृत्यालय ही संस्था गेली ३० वर्षे विद्यार्थ्यांना नृत्य शिकवीत आहे. भरतनाटय़मसोबत विद्यार्थ्यांना लोकनृत्य, पाश्चिमात्य नृत्य शिकता यावे यासाठी संस्थेच्या वतीने दर वर्षी नृत्याचा विविधरंगी अशा नृत्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करते. नृत्योत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची मूळ संकल्पना हीच आहे की भारतीय नृत्यासोबतच इतरही नृत्यांचे प्रकार मुलांना शिकता यावे. पौराणिक कथा, पर्यावरण अशा काही विषयांवर नृत्य सादर केले जाते. तसेच काही पालक असेही असतात की त्यांना नृत्याचे शिक्षण घेता न आल्याने ते मुलांना ते देऊ इच्छितात; परंतु या नृत्योत्सवात त्यांनाही आपली कला सादर करण्याची संधी या महोत्सवामध्ये दिली जाणार आहे. या महोत्सवामध्ये विविध वयोगटांतील नृत्यप्रेमी आपल्या कलेचा आनोखा नजराणा रसिकांसमोर सादर करणार आहेत.
कधी – रविवार, २४ जानेवारी, वेळ : स. १०.३०.
कुठे – आचार्य अत्रे रंगमंदिर, सुभाष मैदान, कल्याण (प.)
उत्सव ढोल-ताशांचा..
अलीकडे बहुतांश वेळा शहरांमध्ये एकत्रितपणे साजरे केल्या जाणाऱ्या पारंपरिक सणांमध्ये उत्साही तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषेत सामील होतात. यात हल्ली विशेष आकर्षण ठरते ते ढोल-ताशा पथकांचे. चेहऱ्यावर उत्साह आणि प्रचंड ऊर्जा असलेली तरुण मुले-मुली स्वागतयात्रा, मिरवणूकीत ढोल-ताशा वाजवताना पाहिल्यावर प्रेक्षकांना उत्साह येतो. मिरवणुकीत जास्तीत जास्त ढोल-ताशा वाद्यवृंदाचा सहभाग दिसायला लागल्यावर वेगवेगळ्या शहरांत तरुणांची ढोल-ताशा पथके अस्तित्वात आली. या निरनिराळ्या ढोल-ताशा पथकांचा पारंपरिक वाद्यांचा नादमयी कल्लोळ ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. विश्वास सामाजिक संस्था अणि वीरगर्जना यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात उत्सव ढोल-ताशांचा हा कार्यक्रम रंगणार आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि पुणे येथील सोळ ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. दोन दिवस ठाणेकरांना ढोल-ताशांची पर्वणी पाहायला मिळणार आहे.
कधी : २३ आणि २४ जानेवारी, वेळ : दुपारी ४ वाजता
कुठे : छत्रपती शिवाजी मैदान, जांभळी नाका, ठाणे
दाक्षिणात्य पदार्थाची कॉन्टिनेंटल चव..
भारतामध्ये सर्वाधिक प्रसिद्धी दक्षीण भारतीय इडली, डोसा, वडा-सांबर यांसारख्या दाक्षिणात्य पदार्थाना मिळाली आहे. सर्व जातींच्या, धर्माच्या लोकांनी या पदार्थाना आपलेसे करून त्यांना दैनंदिन जिवनात महत्त्वाचे स्थान दिली. सध्या शहरांमध्ये परदेशी चवीचे खाद्य पदार्थ सर्वाच्या जिभेवर रुळत असतात. खवय्यांच्या आवडत्या दाक्षिणात्य मेजवानीला एक वेगळा पैलू पाडून खास ‘कॉन्टिनेंटल’ चव देण्यासाठी ठाण्यातील कोरम मॉलतर्फे खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सतये इडली, पिझ्झा डोसा, न्यूडल डोसा, फ्रुट डोसा यांसारखे विविध प्रकारांचे मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये दिले जाणार आहे.
कधी- बुधवार, २७ जानेवारी, वेळ : दुपारी ३ ते ८.
कुठे- कोरम मॉल, मंगल पांडे रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, ठाणे(प.)
वाशीत ४०० विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार
श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून रचण्यात आलेल्या विविध नृत्याविष्कारांचा समावेश असलेल्या ‘शेड्स ऑफ लव्ह’ या कार्यक्रमाचे येत्या २९ जानेवारी रोजी वाशीत आयोजन करण्यात आले आहे. ‘आदिशक्ती संगीत कला केंद्र’ या संस्थेतील ४०० विद्यार्थी या कार्यक्रमात नृत्य सादर करणार असून पद्मविभूषण कथ्थक गुरू पं. बिरजू महाराज यांची या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे.
वाशीतील सिडको सभागृहात २९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास पं. बिरजू महाराज यांच्यासह प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना साश्वती सेन आणि पाश्र्वगायक मोहम्मद अझीझ हे उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे धडे देत गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबईत कार्यरत असलेल्या आदिशक्ती संगीत कला केंद्राच्या तीन संस्थांमधील ४०० विद्यार्थी या वार्षिक कला विहार उत्सवात सहभागी होणार आहेत. श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेभोवती हे विद्यार्थी नृत्य सादर करणार आहेत. त्यासाठी हे विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून सराव करत असल्याची माहिती कला केंद्राचे अतीत कुमार पांडे यांनी दिली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९९६७९६९३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘लॅमिना लाईफ’ चित्रप्रदर्शन
प्रसिद्ध चित्रकार चाऊला दोशी यांच्या दोन प्रकारच्या चित्रांचे ‘लॅमिना लाईफ’ हे प्रदर्शन २५ ते ३१ जानेवारी दरम्यान मांडण्यात येणार आहे. २५ रोजी सायंकाळी ५ वाजता अभिनेता मनोज जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
कुठे: आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी, के दुबाश मार्ग, काळा घोडा, अडोर हाऊस
कधी: सकाळी ११ ते सायं. ७
प्रसिद्ध शिल्पकार बालन नांबियार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
धातूच्या टाकाऊ वस्तू, कांस्य, दगड आणि स्टीलला मुलामा देऊन त्यावर कलाकृती साकारण्यात माहीर असणारे बालन नांबियार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन १९ ते २५ जानेवारीदरम्यान जहांगीर कला दालनामध्ये भरविण्यात आले आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन असून यामध्ये विविध प्रकारची कलाकृती असलेली शिल्पे, मुलामा दिलेली विविध कलाकृती मांडण्यात आली आहेत. ही कला विसाव्या शतकातील प्रसिद्ध इटालियन कलाकार पावलो दी पोली याच्याकडून आत्मसात केल्याचे नांबियार यांनी सांगितले. नांबियार यांनी बनविलेल्या कलाकृती विविध म्युझियममध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या आहेत.
कुठे: जहांगीर कला दालन
कधी: १९ ते २५ जानेवारी
प्लाट-ओ-ग्राफिक इम्प्रेशन्सचे कला प्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर आणि श्रीकांत जाधव यांनी अलीकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचे ‘प्लाट-ओ-ग्राफिक इम्प्रेशन्स’ हे कला प्रदर्शन ठाण्यात मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन आर्ट प्रिव्हिलेज गॅलरी, ब्राह्मण सोसायटी, कर्वे हॉस्पिटलच्या समोर, कोपरी रोड, नौपाडा ठाणे (प.), येथे दिनांक २१ ते ३१ जानेवारी २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामूल्य खुले राहील.
अलीकडच्या काळात लिथोग्राफीला पर्याय म्हणून प्लाटोग्राफी हे माध्यम उपलब्ध झाले आहे. लिथोग्राफीला लागणारी सामग्री दुर्मीळ होत गेल्याने कलाकारांनी प्लाटोग्राफीचे तंत्र विकसित केले आणि त्याचा वापर सुरू केला. इमेज प्रोसेसिंग प्लेटवर हस्तांतरित करून किंवा स्वत: काढून नंतर प्रत्येक िपट्र मशीनवर छापली जाते.
चित्रकार सुहास बहुळकर, श्रीकांत जाधव आणि मधुकर देऊस्कर यांचा कला प्रवास जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सुरू झाला आणि गेली तीन दशके तो निरंतर सुरू आहे. गोपाळ देउस्कर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डेप्युटी डायरेक्टर असताना त्यांचा मार्गदर्शनाखाली ही पिढी तयार झाली. बहुळकर यांची बहुतांश चित्रे ही त्यांच्या लहानपणीच्या आठवणीवर आधारित आहेत. महाराष्ट्राच्या पारंपरिक जीवनशैलीचा प्रभाव या चित्रांवर दिसून येतो. परंपरागत पेहेराव विशेषत: नऊवारी साडी, जुने वाडे, जुन्या शिल्पांप्रमाणे पडलेल्या िभती त्यांच्या चित्रात पाहायला मिळतात.
या प्रदर्शनाचे आयोजक प्रीतम देऊस्कर याविषयी बोलताना म्हणाले , ‘चित्रांची छायाचित्रे ही तेवढीच उठून दिसणारी असून हाताळण्यासाठीही ते सोपी असल्याने ती आता लोकप्रिय झाली आहेत. लिथोग्राफीलाचे तंत्र आता जुने झाले असून त्याची जागा आता प्लाटोग्राफीने घेतली आहे. या तंत्रामुळे दुर्मीळ आणि महागडी चित्रे सामान्य माणसांच्या आवाक्यात आली आहेत.’दोन दिग्गज चित्रकारांची चित्रप्रतिकृती मुंबई आणि ठाण्याच्या कलारसिकांना आपल्या संग्रही ठेवण्याची ही अनमोल संधी चालून आली आहे त्याचा रसिकांनी लाभ घ्यावा.
कुठे : आर्ट प्रिव्हिलेज गॅलरी, ब्राह्मण सोसायटी, कर्वे हॉस्पिटलच्या समोर, कोपरी रोड, नौपाडा ठाणे (प.)
कधी: २१ ते ३१ जानेवारी
शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहण्याची सुवर्णसंधी
प्रसिद्ध कलाकारांचे शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना चालून आली असून २२ ते २४ जानेवारीदरम्यान ‘प्रयाग’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी पू.मधील एसपीजेएमआयआर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मनिपुरी, मोहिनीअट्टम आणि भारतनाटय़ाचा कार्यक्रम होणार असून अनुक्रमे अनसूया रॉय, दर्शना झवेरी, लतासना देवी, सुजाता नायर, जयश्री नायर, आनंद सच्चीदानंद आणि धनंजयन हे आपली कला सादर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी प्राणगंगा अॅम्पी थिएटर, भवन कॅम्पस तसेच श्रीनिवास जोशी आणि शुभदा यांचे ओडिसी होणार आहे. सर्वाना प्रवेश मोफत आहे.
कुठे: एसपीजेएमआयआर सभागृह, अंधेरी पू.
कधी: २२ ते २४ जानेवारी
– शलाका सरफरे