डोंबिवली – डोंबिवली, कल्याण शहरात रविवारी हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आल्या. शहरातील विविध स्तरातील नागरिक पारंपारिक पेहरावात स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. लेझीम, ढोल पथकांचा गजर, जागोजागी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी असे चित्र स्वागत यात्रेत होते. या स्वागत यात्रांच्या माध्यमातून डोंबिवली, कल्याणमध्ये संस्कृती संवर्धन आणि पर्यावरणाचा जागर करणारे चित्ररथ सजविण्यात आले होते.

डोंबिवलीतील स्वागत यात्रेत पंडित दिनदयाळ रस्त्यावर मुस्लिम समाजातर्फे स्वागत यात्रेतील सहभागींचे गुलाब पुष्प देऊन, पुष्पवृष्टी करून स्वागत केले गेले. बालगोपाळ, महिला, पुरूष पारंपारिक पेहरावात सहभागी झाले होते. शहरातील अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात काम करणारी मंडळे स्वागत यात्रेत सहभागी झाली होती. भजन, गाणी गात, ढोल पथकांचा ताल धरत उत्सवी मंडळी चाल करत होती.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या संकल्पनेतून कल्याण, डोंबिवली शहरातील एकूण १२० चित्ररथांवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात शाडुच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करा आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करा, असे संदेश देणारे फलक झळकवले होते. शहरातील ५० चौकांत पर्यावरणाचा जागर करणारे फलक कल्याण डोंबिवली पालिकेकडून लावण्यात आले होते.

नागरिकांनी वीज बचतीसाठी सौर उर्जा आणि इतर अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा प्रभावीपणे वापर करावा यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या संंकल्पनेतून पंतप्रधान सौर घर मोफत वीज योजनेचा प्रचार स्वागत यात्रांच्या माध्यमातून करण्यात आला. विद्युत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे, शीतल शेळके यांनी तयार केलेल्या ध्वनीचित्रफित ध्वनीक्षेपकावरून वाजविण्यात येत होती.

Dombivli, Kalyan, Cultural preservation,
डोंबिवलीतील स्वागत यात्रा

डोंबिवली स्वागत यात्रा

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात रविवारी पहाटे नवर्षानिमित्त आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत बापूसाहेब फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिरात गणेश पूजन करण्यात आले. मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त राहुल दामले, प्रवीण दुधे, सुहास आंबेकर, राजय कानिटकर, आनंद धोत्रे, गौरी खुंटे, जयकृष्ण सप्तर्षी, यांनी आयुक्तांचे स्वागत केले. डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे वृंदावनचे धर्मप्रसारक महंत आचार्य प्रणय महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. स्वागत यात्रेत भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते. कलाकार मंडळी स्वागत यात्रेत सहभागी झाली होती.

Dombivli, Kalyan, Cultural preservation,
कल्याणमधील यात्रा

कल्याणमधील स्वागत यात्रेत

कल्याणमधील स्वागत यात्रा मुरबाड रस्त्यावरील सिडिंकेट येथून सुरू करण्यात आली. इनरव्हिल क्लब ऑफ कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत माजी प्र कुलगुरू डाॅ. नरेशचंद्र, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, खा. सुरेश म्हात्रे, डाॅ. सुश्रृत वैद्य, डाॅ. अर्चना सोमाणी, माजी आ. नरेंद्र पवार, निखील बुधकर, अतुल फडके, अर्चना सबनीस, दीपक चौधरी, नीता कदम, मीनाक्षी देवकर आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

व्यक्तित्व महत्वाचे – आचार्य प्रणय महाराज

बलिदानाचा उत्सव साजरा करणे ही सनातन धर्माची संकल्पना आहे. संभाजी महाराजांच्या बलिदान उत्सवातून एक प्रेरणा मिळते. त्यामधून आपले संस्कृती, संस्कार संवर्धन होते. व्यक्ति म्हणून जन्माला आल्यानंतर संस्कृती, उपजत संस्कारांचे जतन करणे खूप महत्वाचे आहे. हे कार्य करत निघून गेल्यानंतर उरलेल्या व्यक्तित्वामधून त्या व्यक्तिची प्रेरणा समाजाला मार्गदर्शन करत असते. त्यामुळे संस्कृती, संस्करांच्या जतनासाठी व्यक्तित्व खूप महत्वाचे आहे, असे आचार्य प्रणय महाराज यांनी डोंबिवलीत संभाजी महाराज बलिदान कार्यक्रमात सांगितले.