९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनानिमित्त कलाकारांचा संवाद
प्रतिनिधी ठाणे
ठाणे शहरात ९६वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन आयोजित करण्यात आले असून शहरात होणाऱ्या या संमेलनाची पुरेपूर माहिती तरुणाईला व्हावी या उद्देशाने नाटय़ कलाकारांनी तरुणाईशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाटय़ परिषद ठाणे शाखा आणि टॅग या कलाकारांच्या संस्थेच्या वतीने संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी-बेडेकर महाविद्यालय, आर. जे. ठाकूर महाविद्यालय, जीएसएस कॉलेज, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, केबीपी महाविद्यालय आणि एन.के.टी. महाविद्यालय या महाविद्यालयांतील तरुणांशी नाटय़ कलाकारांनी संवाद साधला.
शैक्षणिक संस्थेच्या सामाजिक दायित्वाचा एक उपक्रम म्हणून विद्यार्थी स्वयंसेवकांची फौज उभी करून या ऐतिहासिक समारंभास योगदान देण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. याच निश्चयपूर्तीच्या तयारीसाठी ठाण्यातील मान्यवर नाटय़ कलाकार आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत प्रत्येक महाविद्यालयातील १०० विद्यार्थी नाटय़ स्वयंसेवकांचा नाटय़ संमेलनाच्या आयोजन समितीबरोबर मार्गदर्शन संवाद आयोजित करण्यात आला. विजू माने, मिलिंद सफई, नयन जाधव, प्रशांत विचारे, संतोष जुवेकर, डॉ. अरुंधती भालेराव, कौस्तुभ भामरीकर, सतीश आगाशे, संपदा जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ठाण्यात होणारे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तरुणाईने सर्वाधिक प्रयत्न करण्याची गरज असून हे संमेलन तरुणांचे संमेलन होईल असा प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी या कलाकारांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना संपूर्ण संमेलनाच्या आयोजनाची रूपरेखा स्पष्ट करून आयोजनासाठी निर्मिलेल्या विविध समित्यांवर काम करण्यासाठी व त्यातून मिळालेल्या अनुभवातून नाटय़ चळवळ ठाणे नगरीत भक्कम करण्यासाठी आवाहन केले. अशा कार्यक्रमांच्या आयोजनात विद्यार्थ्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना अनेक कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळेल तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन भविष्यातील नाटय़ चळवळीला सक्षम नेतृत्व लाभेल असा आत्मविश्वास महाविद्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
खर्डी महाविद्यालयाचा ‘कुपोषण मुक्ती अभियान’
विद्यार्थ्यांकडून कुपोषित मुलांना सकस आहराचे वाटप
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर : एकविसाव्या शतकात देश ‘स्मार्ट’ होण्याकडे वाटचाल करत असताना, आजही ‘कुपोषण’ ही देशासमोरील गंभीर समस्या आहे. ग्रामीण लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाची परिस्थिती काही वेगळी नाही. जिल्ह्य़ातील आदिवासी भागात कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. याच अनुषंगाने खर्डी या आदिवासी भागातील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘कुपोषण मुक्ती अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
स्वयंसेवकांनी महाविद्यालयाजवळील वस्ती आणि वाडय़ांना भेट देऊन तेथील कुपोषित बालकांची माहिती गोळा केली. कुपोषणाचे मूळ कारण शोधताना माहितीनुसार लक्षात आले की कुपोषित बालकांचे पालक निरक्षर आहेत. त्यांच्या अत्यल्प उत्पन्नामुळे त्यांच्या बालकांना आणि गर्भवती महिलांना पुरेसा पोषक आहार मिळत नसल्याने कुपोषणाची समस्या उद्भवत आहे. कुपोषण मुक्ती अभियानांतर्गत स्वयंसेवकांकडून कुपोषितांना दर आठवडय़ाला सकस आहार दिला जात आहे. या आठवडय़ात विद्यार्थ्यांनी कुपोषित बालकांच्या उष्मांकात वाढ होण्यासाठी शेंगदाणे व गूळ यांचे वाटप केले होते. तसेच विद्यार्थ्यांनी परिसरातील लोकांना सकस आहार, आरोग्य, स्वच्छता आणि शासकीय योजनांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा विभागातील सुमारे ४० विद्यार्थ्यांमध्ये कुपोषित बालकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक स्वयंसेवक सोपवलेल्या कुपोषित बालकाच्या परिस्थितीचा मागोवा घेऊन महिन्याअखेरीस आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साहाय्याने कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप करणे आणि आरोग्य श्रेणीची नोंद घेतली जात आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांना शाळेतील उपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यात येणार आहे. सामाजिक संस्था, शासकीय व बिगरशासकीय संस्था आणि दानशूर व्यक्तींपर्यंत कुपोषित बालकांची माहिती पोहोचवून त्यांना या अभियानात सहभागी करून घेतले जात आहे.
‘ज्ञानसाधना’च्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा
ठाणे : एक जबाबदार नागरिक म्हणून आज मी ज्या क्षेत्रात वावरतो, काही महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतो, त्या माझ्या व्यक्तिमत्त्वाची सर्वागीण जडण-घडण ज्ञानसाधना महाविद्यालयाच झाली आहे, असे गौरवोद्गार व्यक्त करणारी संस्मरणीय संध्याकाळ अनेकांनी अनुभवली. नुकताच ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला. गेल्या दोन-अडीच दशकापासून ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदेश खारकर, ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नरेश म्हस्के, मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे सदस्य अभिजित चव्हाण, तसेच छत्रपती पुरस्कारविजेता संदीप आवारी आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रांत आपल्या वैशिष्टय़पूर्ण योगदानामुळे स्वत:च्या नावाची मोहर उमटविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. विशेषत: महाविद्यालयाच्या एन.एस.एस. उपक्रमातून आपल्यामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक उत्तरदायित्वाचाही उल्लेख या प्रसंगी करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी भविष्यातील आगामी योजनांचा आढावा घेतला. डॉ. धनंजय मुळजकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा या वेळी प्रस्तुत केला. प्रा. रुपाली मुळ्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
वझे-केळकर महाविद्यालयाचा झपूर्झा महोत्सव
जतिन तावडे, युवा वार्ताहर : वझे-केळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा आणि कलेच्या माध्यमातून समाजात त्यांनी प्रभोधनाचे कार्य व्हावे या हेतूने दर वर्षी ‘झपूर्झा’ या सामाजिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून व ‘उत्क्रांती- ध्यास नवा समाजसेवा’ अशी संकल्पना आहे.
माजी राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रमोद पाब्रेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या वेळी ठाणे येथे रंगणाऱ्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाविषयी माहिती देण्यासाठी अरुंधती भालेराव, अभिनेत्री सुप्रिया पठारे, अभिनेता नयन जाधव व प्रशांत विचारे तसेच रंगरसिक उपस्थित होते. एन.एन.एस.च्या झपूर्झा महोत्सवातील या वर्षीच्या संकल्पनेला अनुसरून पहिल्या दिवसात रांगोळी, समूह नृत्य, वाद्यवादन, पोस्टर मेकिंग, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, सादरीकरण, स्पर्धा पार पडल्या गेल्या. या सर्व स्पर्धामध्ये ठाणे व मुंबईतील १५ महाविद्यालयांतील सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘डिरेक्टर कट’ नामक स्पर्धेत शहरांच्या समस्यांबाबत तरुणांची मते लघुपटाद्वारे विचारात घेतली गेली तसेच ‘फ्रेम इट’ या स्पर्धेतून जनसामान्यांचा समस्यांवरील छायाचित्रे तरुणांनी सादर केली. ‘रंगावली’ या स्पर्धेद्वारे पर्यावरणाच्या संदर्भात विविध विषय रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले. कलरफुल स्ट्रोक या स्पर्धेद्वारे टी-शर्ट पेंटिंगच्या माध्यमातून बालकांचे शोषण हा विषय मांडण्यात आला. तसेच ‘ताळमेळ’ व ‘शेक अ लेग’ या स्पर्धाद्वारे वाद्यवृंद व पारंपरिक नृत्य यांचे सादरीकरण करण्यात आले.
महोत्सवाचा दुसरा दिवस अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांनी युक्त असून त्यात पथनाटय़, एकपात्री अभिनय, ट्रेजर हंट, समूह गीत गायन व काव्य वाचन स्पर्धा होणार आहे. स्पर्धा संपल्यावर अनेक पारितोषिकांसह एका सर्वात्कृष्ट महाविद्यालयाची निवड करून त्यास झपूर्झा महोत्सवाचे फिरते चषक देण्यात येणार आहे.
कठपुतल्यांच्या पथनाटय़ाचा गौरव
विद्यापीठाच्या उडान महोत्सवात एसएसटीच्या विद्यार्थ्यांची बाजी
ठाणे :
मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित ‘उडान’ महोत्सवात उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयाच्या डीएलएलई विभागाला पथनाटय़ासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. पथनाटय़ म्हटले की साहिजिक पांढरा झब्बा आणि ओढणी लपेटून एखाद्या सामाजिक मुद्दय़ाला स्पर्श केला जातो. मात्र विद्यापीठाच्या उडान महोत्सवात एसएसटी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थिनींनी स्त्रियांच्या व्यथा कठपुतलीच्या माध्यमातून मांडल्या. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला स्त्रियांनीच वाचा फोडली पाहिजे, नवदुर्गाची पूजा वरिष्ठ मंडळींकडून केली जाते मात्र शिकण्याचा अधिकार आजही स्त्रियांना नाकारला जातो यासाठी विद्यार्थिनींनी आवाज उठवला पाहिजे, असा संदेश या वेळी देण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राजस्थानी कठपुतलीच्या वेशभूषा या वेळी केल्या होत्या. प्रा. संभाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री विनयभंग, अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या व कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे हे पथनाटय़ उपस्थितांना भावले आणि विद्यापीठाचे डीएलएलई युनिटच्या मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिकाचे चषक विद्यार्थ्यांना देण्यात आले. एकूण १८ महाविद्यालयांनी सादर केलेल्या पथनाटय़ापैकी एसएसटी महाविद्यालयाने बाजी मारली.
सेल्फीत गुंतून राहू नका!
प्रदीप पटवर्धन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
बदलापूर :‘सेल्फीत गुंतून राहू नका, असे काही तरी कर्तृत्व दाखवा ज्याने लोक तुमचे छायाचित्र काढतील आणि तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील,’ असे आवाहन सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी केले. गोवेलीच्या जीवनदीप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी ते बोलत होते.
जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यलयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. या वेळी प्रदीप पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ‘आजच्या तरुणाईला सेल्फीचे प्रचंड वेड लागले आहे, यात बऱ्याचदा त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. मुरुडची घटना अशीच दु:खद आहे, मात्र त्याच वेळी विद्यार्थ्यांचा अतिउत्साहीपणाही विसरता कामा नये,’ असे ते म्हणाले. ‘एखाद्या कार्यक्रमात प्रसिद्ध व्यक्ती आली की, त्यांनाही चाहत्यांसोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र आज मी कुणासोबतही सेल्फी काढणार नाही आणि कुणाच्याही सेल्फीत सहभागी होणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जीवनदीप महाविद्यालयात चोवीस तास सुरू असणाऱ्या कमलाताई कथोरे मध्यवर्ती ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर पोहोचविणाऱ्या आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू व विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
बेडेकर महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे डॉ. वा. ना. बेडेकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन २० फेब्रुवारीला करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून विद्याप्रसारक मंडळाचे दिवंगत अध्यक्ष डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही स्पर्धा भरविण्यात येत आहे. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील २५ वर्षांच्या आतील स्पर्धकांना सहभागी होता येणार असून स्पर्धेची प्रवेश फी १०० रुपये आहे. प्रत्येक महाविद्यालयातर्फे एका स्पर्धक संघास यात सहभागी होता येईल. प्रत्येक स्पर्धकास सहा मिनिटांचा कालावधी दिला असून ‘पुरस्कार वापसी योग्य की अयोग्य’ या विषयावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पुण्याच्या स. प. महाविद्यालयाने ही स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला पाच हजार रोख, द्वितीय विजेत्या संघाला तीन हजार व तृतीय विजेत्या संघाला दोन हजार रुपये रोख बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहेत. यासोबतच मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर व जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शकुंतला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून संयोजन समिती सदस्य उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, गं्रथपाल प्रा. नारायण बारसे, महेश पाटील, विमुक्ता राजे यांचाही सहभाग आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
महेश पाटील- ९३२४३६६२२०, विमुक्ता राजे- ९८९२९३७४०६, सुभाष शिंदे- ९८२०३२८२२६.
महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय परिषद
ठाणे : महात्मा गांधींच्या विचाराचे मंथन व्हावे यासाठी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयात १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिलेवन्स ऑफ महात्मा गांधी थॉट्स इन २१ सेंच्युरी’ या मुख्य संकल्पनेवर आधारित विविध शोधपत्रिकांचे सादरीकरण केले जाणार आहे.
मुख्य संकल्पनेसोबत महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, सत्याग्रह आणि अहिंसा, खेडय़ाकडे चला हा गांधींचा संदेश, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील गांधींचे विचार, खादी आणि ग्रामोद्योग, व्यवसायाच्या मूल्यांवरील गांधींचे विचार, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, लोकशाही आणि महात्मा गांधी अशा विविध विषयांवर या राष्ट्रीय परिषदेत शोधपत्रिका सादर करता येणार आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘मोहन ते महात्मा’ यावर आधारित प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. काही आमंत्रित वक्त्यांची भाषणे होऊन गांधींच्या चळवळीची ध्वनिचित्रफीत परिषदेत दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी विषयाला अनुसरून चर्चासत्र आणि संशोधन पत्रिका सादर करण्यात येणार आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांमध्ये संशोधन पत्रिका सादर करता येणार आहेत.