कल्याण : कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त संस्कृती जीवन आधारित कार्यक्रमांचे नियोजन आणि चित्ररथांची आखणी करण्यात आली आहे. याशिवाय कल्याण पूर्व, कोन, २७ गाव येथेही स्थानिक पातळीवर स्वागत यात्रांचे स्थानिक सामाजिक संस्थांनी नियोजन केले आहे.डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून स्वागत यात्रेच्या धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंब या पंचसुत्रीवर डोंंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची आखणी करण्यात आली आहे. वृंदावनचे प्रभूदेशदास आचार्य प्रणय महाराज यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ४० हून अधिक चित्ररथ स्वागत यात्रेत असणार आहेत.
भागशाळा मैदानात मनोरंजन, साहसी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जम्मू येथील दिशा छात्रावास, कटरा येथील विद्यार्थी नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी येणार आहेत. काश्मीरी सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थी स्वागत यात्रेत सादर करणार आहेत. चैत्रपाडव्याच्या दिवशी भागशाळा मैदान येथून स्वागत यात्रेला सकाळी सात वाजता प्रारंभ होणार आहे. साडे दहा वाजता फडके रस्त्यावरील गणेश मंदिर येथे स्वागत यात्रेचा समारोप होणार आहे. गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, प्रमुख संयोजक अमेय काटदरे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
कल्याण येथे इनरव्हिल क्लब ऑफ कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दीपोत्सव, सांगीतिक कार्यक्रम, महारांगोळी असे नियोजन संयोजकांनी केले आहे. संतोषी माता रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण येथे संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रांगोळी काढली आहे. रविवारी सकाळी सात वाजता मुरबाड रस्त्यावरील आयुक्त बंगला येथून स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे. नमस्कार मंडळ येथे स्वागत यात्रेचा समारोप होईल.
इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डाॅ. अर्चना सोमाणी, मंचचे अध्यक्ष डाॅ. सुश्रृत वैद्य आणि सहकाऱ्यांनी स्वागत यात्रेचे नियोजन केले आहे. कोन गाव येथे जांभुळवाडी येथून संध्याकाळी चार वाजता नववर्ष स्वागत यात्रेला सुरूवात होणार आहे. स्वागत यात्रा समिती संस्थापक अध्यक्ष सुनील म्हात्रे, अध्यक्ष राजाभाऊ म्हात्रे, मीनाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने निघणाऱ्या स्वागत यात्रेचे उद्घाटन कोन गावच्या सरपंच रेखा पाटील करणार आहेत. त्यानंतर कोनगाव परिसरातून स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे.