कल्याण – कल्याण संंस्कृती मंच आणि इनरव्हिल क्लब ऑफ कल्याणतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांची यावेळी रेलचेल असणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीत स्वारंगिणी हा गाण्यांचा कार्यक्रम, दीपोत्सव आणि महा रांगोळी हे उपक्रम असणार आहेत. हेच या वेळच्या स्वागत यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आठवडाभर विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कल्याणकर नागरिक मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होतील, असे नियोजन आयोजकांनी केले आहे. इनरव्हिल क्लब ऑफ कल्याण ही यावेळची स्वागत यात्रेची यजमान संस्था आहे.
२३ मार्च रोजी स्वरांगिणी हा सूर तालाचा अनोखा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे संध्याकाळी साडे पाच वाजता होणार आहे. प्रबोधनकार ठाकरे सरोवर (काळा तलाव) येथेच २३ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या कालावधीत सरोवर परिसर दीप लावून सजविला जाणार आहे. लाखो पणत्यांचे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
२८ मार्च रोजी संतोषी माता रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मैदान, रामबाग येथे संस्कार भारती कल्याण शाखेतर्फे भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. ही रांगोळी सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी खुली असणार आहे.
३० मार्च रोजी सिंडीकेट येथील आयुक्त बंगला येथून सकाळी सहा वाजता नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे. विविध प्रकारचे देखावे साकारलेले चित्ररथ नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. पारंपारिक वेशभुषेत नागरिकांनी स्वागत यात्रेत सहभाग होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
इनरव्हिल क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डाॅ. अर्चना सोमाणी, सचिव ॲड. नीता कदम, प्रकल्प प्रमुख ॲड. अर्चना सबनीस, सहप्रमुख मीनाक्षी देवकर, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डाॅ. सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, ॲड. निखील बुधकर, अतुल फडके आणि सहकाऱ्यांनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे नियोजन केले आहे.