पूर्वा साडविलकर
ठाणे : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेगवेगळय़ा उपाययोजनांची आखणी एकीकडे होत असतानाच, मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीनमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मेन्स्ट्रअल कप बाजारात उपलब्ध आहेत. महिलांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाण्यातील आर निसर्ग संस्थेने ‘सखी प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत या संस्थेतील सदस्य शहरी तसेच ग्रामीण पट्टय़ात जाऊन महिलांमध्ये या कपविषयी प्रसार करत आहेत.

महिलांना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमध्ये त्यांच्याकडून सॅनिटरी नॅपकिनचा मोठय़ा प्रमाणात वापर होताना दिसून येतो. प्लास्टिक तसेच रासायनिक द्रवांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांच्या आरोग्याला हानी पोहोचत असते. परंतु, याकडे महिला सर्रासपणे दुर्लक्ष करतात आणि याचे रूपांतर अनेकदा मोठय़ा आजारात होताना दिसून येते. या सॅनिटरी नॅपकिनचा पर्यावरणालाही तितकाच धोका निर्माण होत आहे. अनेक सॅनिटरी नॅपकिन तयार करताना त्यामध्ये ८० ते ८५ टक्के प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचे विघटन होत नसून पर्यावरणाला याची हानी पोहोचत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी बाजारात मासिक कप हा पर्याय उपलब्ध आहे. महिलांमध्ये मेन्स्ट्रअल तथा मासिक कपविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे शहरातील आर निसर्ग संस्थेने पुढाकार घेतला आहे. ही संस्था सखी या प्रकल्पांतर्गत हे काम करत आहे. २०१९ पासून ते आतापर्यंत या संस्थेने ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही जनजागृती करण्यास सुरुवात केली. संस्थेचे सदस्य प्रत्येक गावा गावात जाऊन महिलांशी संवाद साधत तसेच या कपचा वापर कसा करावा याचे सत्रदेखील राबवीत आहेत.

करोनाकाळातही ऑनलाइनच्या माध्यमातून संस्थेने सत्र राबविले होते. आतापर्यंत ही संस्था जिल्ह्यातील विविध गाव-पाडय़ांमधील तसेच शहरांतील दहा हजार नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. संस्थेच्या या जनजागृती मोहिमेमुळे जिल्ह्यातील ४ ते ५ हजार महिला मेन्स्ट्रअल कप वापरण्यास तयार झाल्या असून या महिलांना संस्थेमार्फत मोफत मासिक कपचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका डॉ. लीना केळशीकर यांनी दिली.

मदत क्रमांकही..
महिलांनी या कपचा वापर करावा यासाठी संस्थेने मदत क्रमांक तयार केला आहे. यामध्ये महिलांना मासिक कप वापरताना काही अडथळा किंवा शारीरिक समस्या निर्माण झाल्यास महिलांनी त्या मदत क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. यामध्ये तात्काळ त्या संस्थेच्या सदस्यांचे मार्गदर्शन तसेच काही शारीरिक समस्या असल्यास स्त्री रोगतज्ज्ञांचा सल्ला दिला जात आहे.

कपचे फायदे
मासिक पाळीच्या काळात डाग आणि वारंवार बदलावे लागणारे सॅनिटरी नॅपकिन हीदेखील समस्या आहे. मेन्स्ट्रअल कपमुळे महिलांचे हे कष्ट वाचत असून त्यांच्या इतर समस्याही दूर होण्यास मदत होते. तसेच या कपचा पर्यावरणाला फायदा असून याचा उपयोग वर्षांनुवर्षे करणे शक्य आहे.

Story img Loader