पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा अवघ्या काही तासांत रद्द करण्यात आल्यानंतर सर्वत्र चलनटंचाई निर्माण झाली असली तरी घरात अडीनडीसाठी राखून ठेवल्या जाणाऱ्या रोख रकमेने अनेकांना तारले आहे. आधुनिक युगात कॅशलेस व्यवहारांचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी किमान काही रक्कम रोख स्वरूपात घरी ठेवली जाते. अशी रक्कम बाळगणाऱ्यांमध्ये गृहिणी आघाडीवर असतात. घरखर्चासाठी मिळालेल्या रकमेतून त्या काही रक्कम बाजूला काढून ठेवतात. बहुतेकदा या नोटा नव्या, कोऱ्या करकरीत असतात. अशा नोटांनी अनेकांना  दिलासा दिला.

बँकेतर्फे रद्द चलन स्वीकारून त्याबदल्यात नवे चलन वितरित केले जात असले तरी मागणीच्या तुलनेत ते कमी पडत आहे. त्यामुळे पैसे असूनही ‘कफल्लक’ असल्यासारखी अनेकांची अवस्था आहे. अशा परिस्थितीत घरोघरी असलेली गृहलक्ष्मी मदतीला धावून येऊ लागली आहे. अनेकांना आई, पत्नी, बहीण, मावशी, काकू आणि वहिनीकडून  चलनपुरवठा होत आहे. या व्यवहारात परस्परसामंजस्य आहे. या नोटांच्या बदल्यात काही महिला पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारीत आहेत. कारण गृहिणींना त्यांच्या खात्यात अडीच लाख रुपये भरता येणार आहेत. बँकेत नियमानुसार फक्त एका वेळी दोन हजार रुपयेच मिळत आहेत. मात्र या मार्गाने पाच, दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम नागरिकांना वापरासाठी मिळू लागली आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे केवळ पूजेच्या मखरापुरत्या मर्यादित असलेल्या चलनाने व्यावहारिक जगात मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.

ठेवणीतल्या नोटा चलनात

दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी नव्याकोऱ्या नोटा वापरल्या जातात आणि पुन्हा कपाटात ठेवल्या जातात. या नोटा शक्यतो खर्च केल्या जात नाहीत. तसेच पतीच्या अथवा मुलाच्या पहिल्या पगारातील नोट, भावाकडून मिळालेली भाऊबीज भेट असे त्या चलनाचे स्वरूप असते. मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेकदा घरातील लहान मुलांना गल्ला दिला जातो आणि त्यात पैसे साठवण्यास सांगितले जाते. मात्र गेल्या आठवडय़ात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर घरोघरी पूज्य असलेली ही लक्ष्मी हळूहळू चलनात येऊ लागली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या दहा- वीस- पन्नास- शंभर रुपयांच्या कोऱ्या नोटा चलनात येऊ लागल्या आहेत. सध्या चलनटंचाईच्या काळात अनेक कुटुंबांना या नोटांनी तारले आहे.

 

 

Story img Loader