कल्याण – कल्याण पश्चिमेत टिळक चौक भागात बालक मंदिर शाळेजवळील कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यानातील झाडांची छाटणीच्या नावाखाली कत्तल करण्यात आली आहे. या प्रकाराने परिसरातील रहिवासी, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे शासन, पालिकेकडून पावसाळा आला की झाडे लावा, झाडे जगवाचा जयघोष केला जातो. आता या जुनाट हवेशीर झाडांच्या फांद्या भर उन्हाळ्यात तोडून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन नक्की काय साध्य करत आहे, असे प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत. टिळक चौक ते तेलवणे रुग्णालय दरम्यानच्या रस्त्यावर बालक मंदिर शाळा परिसरात पालिकेचे उद्यान आहे. सकाळ, संध्याकाळ परिसरातील नागरिक याठिकाणी फिरण्यासाठी, बालकांना घेऊन मनोरंजनासाठी येतात.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान आहे. त्यामुळे टिळक चौक परिसरातील ज्येष्ठ, वृध्द नागरिकही याठिकाणी सकाळ, संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. या उद्यानात जुनाट झाडे आहेत. या झाडांवर कावळे, चिमण्या, खार, साळुंकी अशा अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. सकाळ, संध्याकाळ उद्यानातील झाडांंवर पक्ष्यांचा कलकलाट असतो. हा आस्वाद घेण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी नागरिक आवर्जून याठिकाणी भ्रमंतीसाठी येतात.

पालिकेकडून या उद्यानाची नियमित देखभाल केली जाते. याठिकाणी मनोरंजनाची साधने आहेत. सकाळच्या वेळेत झाडांच्या खाली अनेक नागरिक योगसाधना करत असतात. मंगळवारी अचानक पालिकेचे कंत्राटी कर्मचारी येऊन टिळक चौकातील उद्यानातील झाडांची छाटणी करून लागल्याने काही जागरूक नागरिकांनी त्यास आक्षेप घेतला. त्यावेळी पालिकेने झाडांवरील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आम्ही ही कामे करत आहोत, अशी उत्तरे कापकाम कामगारांनी दिली.

झाडांच्या फांद्या तोडणे म्हणजे जुनाट मोठ्या झाडांची कत्तल करणे नव्हे, असे नागरिकांकडून कामगारांना सांगण्यात आले. त्याला थंड प्रतिसाद मिळाला. बघता बघता कापकाम कामगारांनी उद्यानातील जुनाट झाडांवरील मोठ्या फांद्या कापकाम यंत्राने कापून टाकल्या. भर उन्हाळ्यात झाडांच्या सावली देणाऱ्या फांद्या कापून टाकण्यात आल्याने नागरिक तीव्र नाराज झाले आहेत. धोकादायक फांद्या तोडणे म्हणजे खोडापासून झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून टाकणे नव्हे. वर्दळीचे रस्ते, गल्ली बोळातील वाहतुकीला, जीविताला धोकादायक ठरणारी झाडे, त्यांच्या फांद्या पालिकेने जरूर तोडाव्यात, पण ज्या झाडांपासून, फांद्यापासून कोणालाही त्रास नव्हता. त्या तोडून पालिकेला काय मिळाले, असे प्रश्न कल्याणमधील नागरिक उपस्थित करत आहेत.

पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याची कामे सुरू केली आहेत. ही कामे केली नाहीत तर पावसाळ्यात वादळ, वाऱ्यात या फांद्या तुटून जीवित, वित्त हानीची शक्यता असते. त्यामुळे झाड, त्यांच्या फांद्या धोकादायक आहेत की नाही ते पाहूनच ही छाटणी केली जात आहे. – संजय जाधव, उपायुक्त, उद्यान विभाग.