लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात सायबर फसवणूकीच्या प्रकरणांत सातत्याने वाढ होत आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ऑनलाईन फसवणूक करून सायबर गुन्हेगारांनी ठाणेकरांचे २०२४ या वर्षभरात १६२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक फसवणूक ही शेअर बाजाराच्या नावाने झाली आहे. या वर्षीही अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे फसणूकीचे हे जाळे अद्यापही सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोनानंतर अनेकजण शेअर बाजार, ऑनलाईन घरबसल्या कामे करू लागले आहेत. परंतु याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या मोठ्याप्रमाणात सक्रीय झाल्या. अवघ्या काही रुपयांच्या मोबदल्यात नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत असल्याचे ठाणे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या शहरात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ७१९ ऑनलाईन फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगारांनी ठाणेकरांची १६२ कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. यातील फक्त ३९ प्रकरणांचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले आहे.

या प्रकरणांमध्ये सर्वाधिक फसवणूक ही शेअर बाजाराच्या नावाखाली होत आहे. नागरिकांना समाजमाध्यमांवर संपर्क साधून त्यांच्या मोबाईलमध्ये शेअर बाजारासंदर्भातील एक बनावट ॲप सामाविष्ट करून त्यामध्ये नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर त्या ॲपमध्ये गुंतवणूकीच्या मोबदल्यात चांगला परतावा दाखविला जातो. ज्यावेळी गुंतवणूकदार ॲपच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो. ते पैसे त्याला मिळत नाही. अशाचपद्धतीने घरबसल्या कामांच्या (टास्क) नावाखाली देखील फसवणूक केली जात आहे. घरामध्ये बसून ऑनलाईनरित्या एखाद्या हॉटेल किंवा व्यवसायाविषयी प्रतिक्रिया नोंदविण्याच्या बदल्यात चांगले पैसे देत असल्याचे सांगत नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.

याचप्रमाणे मागील काही महिन्यांत डिजीटल अटक प्रकरण देखील वाढत आहेत. एखाद्या व्यक्तीला पोलिसांच्या वेशात ‘व्हिडीओ कॉल’द्वारे संपर्क साधून त्याला अटकेची धमकी देत पैसे उकळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एखादे कुरिअर विदेशात सीमा शुल्क विभागात अडकल्याचे सांगून त्यानंतर नागरिकांना अटकेची धमकी देत त्यांच्याकडून फसवणूक करण्याची प्रकरणे समोर आली आहेत. पोलीस तसेच सरकारकडून समाजमाध्यमांद्वारे जनजागृती केली जाते. परंतु पैशांच्या मोहामध्ये नागरिक स्वत:हून या जाळ्यांत अडकत असल्याचे प्रकरणांतून स्पष्ट होत आहे.

प्रकरणे गुन्हे दाखल
शेअर बाजारच्या नावाखाली फसवणूक११६
टास्क देऊन फसवणूक५८
डिजीटल अटक फसवणूक५०
कुरिअर अडकल्याचे सांगत फसवणूक२६
इतर सायबर गुन्हे४६९
एकूण ७१९

या संदर्भात सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

सरकार जनजागृती करत असले तरी नागरिकांची स्वत:ची जबाबदारी आहे की, त्यांनी सतर्क राहावे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. त्याचबरोबर पोलीस यंत्रणांना अधिक आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्याप्रमाणात होत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता येईल. -ॲड. प्रशांत माळी, सायबर तज्ज्ञ.