ठाणे : ठाणे आयुक्तायल क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे सायबर पोलीस ठाणे अखेर कार्यान्वित झाले आहे. नव्या पोलीस ठाण्यामुळे आता सायबर गुन्ह्यासंदर्भात तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यात सहा अधिकारी आणि ३० कर्मचारी असणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे.

गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रकरणे देखील वाढली आहेत. ठाण्यात दररोज सायबर गुन्हे घडत आहेत. शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक, मोबाईलवर एखादी लिंक पाठवून बँक खाते रिकामे करणे, ऑनलाईन ‘टास्क’ देऊन आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकरणांमध्ये फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक आहेत.

हेही वाचा – शक्तिप्रदर्शन करत रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा – Geeta Jain: “भाजपाकडून भ्रष्टाचारी उमेदवाराला तिकीट, मी गुवाहाटाली जाऊनही…”, गीता जैन यांची टीका

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र असे पोलीस ठाणे नव्हते. त्यामुळे सायबर गुन्हे शोध कक्षामार्फत पोलीस तपास करत होते. काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ सायबर पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहा अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहे.