पालिकेच्या सायकलसेवेला चांगला प्रतिसाद; दोन आठवडय़ांत साडेचारशे सभासद
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा (टीएमटी) ढिसाळ कारभार आणि रिक्षाचालकांची मुजोरी यांना कंटाळलेल्या ठाणेकरांचा शहरांतर्गत प्रवास सुखाचा व स्वस्तात व्हावा, यासाठी महापालिकेने सुरू केलेली सायकल सेवा अल्पावधीतच लोकप्रिय ठरू लागली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गालगत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या सायकल स्थानकातून सायकली घेऊन ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून गेल्या दोन आठवडय़ांत साडेचारशेहून अधिक जणांनी या सेवेसाठी नोंदणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरात खासगी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. यामुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले असल्याचा निष्कर्ष मध्यंतरी महापालिकेच्या पर्यावरण अहवालात काढण्यात आला होता. शहरातील वाढती प्रदूषणाची पातळी लक्षात घेत ठाणे महानगरपालिकेने ‘न्यू एज मीडिया पार्टनर’ आणि ‘साईन पोस्ट इंडिया’ या कंपनीच्या मदतीने शहरातील विवियाना मॉल, माजिवडा आणि कोरम मॉल येथे सायकल स्थानक सुरू केले आहे. या माध्यमातून प्रत्येक नोंदणीधारकाला एक लाख रुपयांचे विमाकवचही देण्यात येणार आहे. नोंदणीधारकाला प्रत्येक तासामागे १० रुपये देऊन सायकल नेता येणार आहे. महापालिकेने आखलेली ही योजना यशस्वी ठरण्याची सुचिन्हे दिसू लागली असून गेल्या दोन आठवडय़ांत सायकली भाडय़ाने मिळाव्यात यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे, असा दावा सूत्रांनी बोलताना केला. येत्या काही दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागात अशा ५० सायकल स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी अद्याप दोन महिने वाट पाहावी लागणार आहे.
या सायकली महिला आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. तसेच या सायकलला जीपीएस प्रणाली बसविण्यात आली असल्याने सायकल कुठे आणि कितीकाळ वापरली याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांकडे असणार आहे. तसेच सायकल चालविणाऱ्याने किती कॅलरीज बर्न केल्या याची माहिती चालकाला अॅपद्वारे मिळणार आहे.
स्थानक परिसरातही सायकल स्थानके
पहाटे चालविणाऱ्यांची संख्या, कामगारांची संख्या, याची माहिती घेऊन मागणीप्रमाणे ही सायकल स्थानके उभारण्यात येणार आहेत. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहून या भागातही सायकल स्थानके सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
प्रस्तावित सायकल स्थानके
- सिंघानिया शाळा, वर्तकनगर, मासोळी बाजार, उपवन, काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली, मानपाडा, आर. मॉल, सिनेवंडर
- प्रत्येक एक किलोमीटर इतक्या अंतरावर ही सायकल स्थानके असणार आहेत.
नोंदणी कशी कराल?
- तुमच्या मोबाइलमध्ये ‘आयलव्हसायकलिंग’ नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप अॅण्ड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर उपलब्ध आहे.
- नोंदणी करण्यासाठी या अॅपमध्ये खाते तयार करावे लागते. त्यात तुमचा आधार क्रमांक आणि छायाचित्र तसेच काही वैयक्तिक माहिती भरावी लागते.
- या अॅपमध्ये ऑनलाइन माध्यमातून पैसे भरावे लागतात.
- जेव्हा आपण सायकल स्टॅण्डवर जाऊ तिथील बारकोडवर मोबाइल कॅमेऱ्याने क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची सायकल अनलॉक करता येते.
- सायकल स्टॅण्डवर नेमून देण्यात आलेल्या व्यक्तींकडे आधारकार्डची छायांकित प्रत, २५० रुपये वार्षिक वर्गणी आणि दोन छायाचित्रे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती तुम्हाला जागेवर स्मार्टकार्ड देईल. या स्मार्टकार्डद्वारे तुमची सायकल अनलॉक करू शकाल.