कल्याण: जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय सायकल दिनाचे औचित्य साधून ४ जून रोजी कल्याण शहरात कल्याण डोंबिवली पालिका, बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि डोंबिवली, कल्याण मधील विविध सायकल गटांतर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रसिध्द सायकलपटू आणि पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
बिर्ला महाविद्यालय प्रांगणात होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, बि. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डाॅ. नरेशचंद्र, प्राचार्य डाॅ. अविनाश पाटील, समन्वयक प्रशांत भागवत उपस्थित राहणार आहेत. सकाळी सहा वाजता बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणातून सायकल फेरीला सुरुवात होणार आहे.
बिर्ला महाविद्यालय येथून सुरूवात होणारी सायकल फेरी भवानी चौक, सुभाष चौक, वालधुनी शिवाजी चौक, विठ्ठलवाडी चौक, चक्की नाका, पत्रीपूल, सहजानंद चौक, लालचौकी, वाडेघर चौक, खडकपाडा चौक ते बिर्ला महाविद्यालय येथे समाप्त होणार आहे. कल्याण सायकलिस्ट, हिरकणी, डोंबिवली, पलावा, टीम बाईकपोर्ट असे सायकल गट सहभागी होणार आहेत. सहभागी सायकलपटूंना टी शर्ट, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.