मिरा भाईंदरमध्ये शनिवारी (२२ जानेवारी) मध्यरात्री समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तन येथील बोटीचे गंभीर नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सद्यस्थितीत मिरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तुटलेल्या बोटीचे साहित्य एकत्र गोळा करण्याचे काम सुरू आहे.
भाईंदर पश्चिम येथे उत्तन हा समुद्र किनारी वसलेला परिसर आहे. या भागात राहणारे नागरिक प्रामुख्याने मासेमारीचा व्यवसाय करून त्यावर आपली उपजीविका भागवत आहेत. या किनाऱ्यावर साधारण ७०० हून अधिक बोटी आहेत. या बोटी किनाऱ्यावर उभ्या राहण्यासाठी शासनाकडून जेटीची (बोटी उभी करण्याचे ठिकाण) निर्मिती देखील करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बोटी जेटीवर उभ्या असताना समुद्रात वादळांची निर्मिती झाल्याची घटना घडली.
“जेसीबीच्या साहाय्याने तुटलेल्या बोटीचे अवशेष समुद्राबाहेर काढण्याचे काम सुरू”
या वादळात सोसाट्याचा वारा सुटल्याने तो थेट किनाऱ्यावर असलेल्या बोटींवर आदळला. यामुळे एका मोठ्या व लहान अशा दोन बोटींचे प्रचंड नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे या बोटी बांधण्यात आलेल्या नांगराला मोडून थेट समुद्रात बुडाल्या आहेत. या घटनेची माहिती स्थानिक मच्छिमारांना मिळताच त्यांनी पालिकेच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधला. त्यानुसार सध्या जेसीबीच्या साहाय्याने तुटलेल्या बोटीचे अवशेष समुद्राबाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.
हेही वाचा : कोलकात्यात वादळाचे भयानक पडसाद, रस्त्यावर पाणी, दैनंदिन जीव विस्कळीत, फोटो पाहा…
दरम्यान, समुद्र किनारी उभ्या असलेल्या बोटीचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी शासनाकडे केली आहे.