घराचा राखणदार निर्भीड असावा. ज्याचा तरणाबांड देह पाहून अनेकांचा थरकाप उडेल असा श्वान घरात असावा, अशी श्वानप्रेमींची इच्छा असते. श्वान प्रजातींमध्ये डॉबरमन, जर्मन शेफर्ड या प्रजाती राखणदारीसाठी लोकप्रिय आहेत. आकाराने मोठे आणि निर्भीड स्वभाव यामुळे श्वानप्रेमींमध्ये उत्तम राखणदारी करणारे हे श्वान जगभरात मोठय़ा प्रमाणात पाळले जातात. या श्वान प्रजातींच्या कुवतीप्रमाणेच राखणदारीमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी श्वान प्रजात म्हणजे ‘डॅशून्ड’.
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या मराठी भाषेतील म्हणीप्रमाणे आकाराने लहान असला तरी छोटा राखणदार असलेला डॅशून्ड घरात पालनासाठी अतिशय उपयुक्त आहे. अगदी हातावर उचलता येईल एवढा लहान आकार असला तरी ‘जर्मन शेफर्ड’ आणि ‘डॉबरमन’प्रमाणेच ‘डॅशून्ड’ श्वान घराची उत्तम राखण करू शकतात. अठराव्या शतकात जर्मनीमध्ये शिकारीसाठी हे श्वान ओळखले जाऊ लागले. जर्मनीमध्ये जंगलात खारीसारखा दिसणारा ‘बेजर’ नावाचा प्राणी बिळामध्ये आढळत होता. या प्राण्यांच्या शरीरावरील पिसांसाठी ते लोकप्रिय होते. या बेजर प्राण्यांना बिळामधून पकडून जिवंत हातात आणून देण्याचे काम डॅशून्ड श्वान करत. हळूहळू ससे, कोल्हे या प्राण्यांनाही जिवंत पकडून देण्याचे कौशल्य डॅशून्ड श्वानांजवळ होते. रानटी डुक्कराला पकडण्यासाठी आठ ते दहा डॅशून्ड श्वानांचा कळप पुरेसा होता. कालांतराने या श्वानांची उपयोगिता लक्षात आल्यावर डॅशून्ड घरात पाळण्यास सुरुवात झाली. काही तज्ज्ञांच्या मते या श्वानांचे संदर्भ इजिप्तमध्येही आढळतात. १९ व्या शतकात हे श्वान अमेरिकेत आल्यावर जगभरात प्रसिद्ध झाले. सहा ते आठ इंच एवढीच उंची असलेल्या डॅशून्ड श्वानांचे शरीरावरील केसांच्या विविधतेमुळे सहा प्रकार पडतात. स्मूत कोट, लाँग हेअर, वायर हेअर, मिनी कोट अशा काही प्रकारांत हे श्वान आढळतात. जर्मनीमध्ये कार्टूनिस्टमध्ये डॅशून्ड श्वान अतिशय लोकप्रिय आहेत.
वासावरून आपली शिकार पकडण्याचे उत्तम कसब या श्वानांमध्ये आढळते. पूर्वी या श्वानांचे आकार, वजन जास्त होते. मात्र कालांतराने ब्रीडिंग करून डॅशून्डचा आकार आणि वजन कमी करण्यात आले. हातावरही उचलता येतील एवढे वजन आणि आकार या श्वानांचा कमी करण्यात आला.
उन्हापासून रक्षण गरजेचे
जमिनीपासून या श्वानांची उंची कमी असल्याने या श्वानांचा छातीचा भाग जमिनीकडे लागतो. त्यामुळे कडक उन्हापासून या श्वानांचे रक्षण करणे गरजेचे आहे. सकाळी दहापर्यंत आणि सायंकाळी पाचनंतर या श्वानांना बाहेर फिरायला घेऊन गेल्यास उत्तम ठरते. शरीररचना आयताकृती असल्याने इमारतीचे जिने चढल्यास या श्वानांना त्रास होण्याची शक्यता असते. डोळ्यांना इजा होण्यापासून डॅशून्ड श्वानांचे रक्षण करावे लागते.
भारतात मोठय़ा प्रमाणात या श्वानांचे ब्रीडिंग केले जाते. मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी या श्वानांचे ब्रीडिंग होते. डॉग शोजमध्ये पहिल्या दहा श्वान प्रजातींमध्ये डॅशून्ड श्वान कायम असतात. मुंबईतील बॉम्बे प्रेसिडेन्ट केनेल क्लब येथील शिला नाहरवार या मोठय़ा प्रमाणात डॅशून्ड श्वानांचे ब्रीडिंग करतात. शांत स्वभावाचा, उत्तम राखणदार असलेला डॅशून्ड जर्मनीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
सतत कामाची आवश्यकता
या श्वानांचे विशेष म्हणजे आहार वाढवला तर वजन वाढते, मात्र आकारमान वाढत नाही. त्यामुळे या श्वानांचे मूळ वैशिष्टय़ कायम राहते. मात्र या श्वानांना सतत कामाची आवश्यकता भासते. या श्वानांमध्ये असणाऱ्या प्रचंड ऊर्जेवर मालकांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी डॅशून्ड श्वानांना सतत व्यायामाची, कामाची आवश्यकता भासते.
घरातील लहान राखणदार
शिकारी श्वान प्रजातींमधील असल्याने यांचा स्वभाव अतिशय निर्भीड असतो. घरातील लोकांसाठी प्रामाणिक आणि प्रेमळ असला तरी परक्या लोकांसाठी उत्तम राखणदार आहे. घरात राखणदारीसाठी लहान आकाराचे श्वान हवे असल्यास डॅशून्ड उत्तम पर्याय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा