दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळून या खेळाची प्रो कब्बडीच्या धर्तीवर स्पर्धा व्हावी तसेच प्रत्येक गोविंदांचा राज्य शासनाने विमा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून या दोन्ही मागणीबाबत मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या खे‌ळाचा शाळेत नववीपासूनच क्रीडा प्रकारात समावेश केला तर चांगले गोविंदा तयार होतील, असा प्रस्तावही शासनाला दिला असून त्यासही लवकरच मान्यता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून ते याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. हा खेळ वर्षातून एकदाच खेळला जातो आणि त्याचकाळात केवळ सराव केला जातो. या खेळाचा नियमित सराव होत नसल्यामुळे गोविंदा तंदरुस्त नसतात आणि त्यातून त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. क्रीडा प्रकारात समावेश होऊन या खेळाची प्रो कब्बडीच्या धर्तीवर स्पर्धा झाली तर खेळाडू वर्षभर सराव करतील आणि त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असेही खासदार शिंदे यांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालयातील क्रीडा प्रकारात दहीहंडी खेळाचा समावेश केला तर, त्यातून चांगले गोविंदा तयार होतील, असेही ते म्हणाले. तसेच दहीहंडी उत्सावाच्या काळात काही पथके स्वत:च आपला विमा काढतात. तर काही पथकांना विमा काढणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने त्यांचा दहा लाखांचा विमा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली असून ही मागणीही ते लवकरच मान्य करतील, असेही त्यांनी सांगितले.

आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. ही दहीहंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी एक लाख रुपये व पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२ हजार रुपये, सहा थरांसाठी ८ हजार रुपये, पाच थरांसाठी ६ हजार रुपये आणि चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahihandi will soon get the status of an adventure sport information of mp shrikant shinde amy