ठाणे : डायघर येथील कचरा प्रकल्प गेले काही दिवस बंद असल्यामुळे ठाणेकरांना कचरा समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे ठाणे महापालिकेने आता हा प्रकल्प ठेकेदाराकडून ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पासाठी केलेल्या खर्च देण्याची मागणी ठेकेदाराकडून होत असल्यामुळे पालिकेने प्रकल्पासाठी खरोखर नेमके किती पैसे खर्च झाले, याचा हिशोब करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई आयआयटीचे पथक नेमले जाणार असल्यामुळे या प्रकल्पाची चिरफाड होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. याठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नव्हती. कचरा दुर्गंधी आणि आगीमुळे परिसरात धुर पसरत होता. स्थानिकांच्या विरोधानंतर पालिकेने ही कचराभुमी बंद करून पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात कचरा प्रकल्प उभारला होता. वर्षभरासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला असला तरी दिड वर्षे होऊनही तो सुरूच होता. डायघर येथील कचरा प्रकल्प कार्यान्वित होताच पालिका प्रशासनाने भंडार्ली येथील कचराभुमी बंद केली. डायघर प्रकल्पात कचऱ्यापासून वीज निर्मीती करण्यात येणार होती. परंतु या प्रक्रीयेस उशीर होत असल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते. या ठिकाणी कचरा विल्हेवाटीसाठी परदेशातून यंत्रे आणण्यात आली होती.

डायघर प्रकल्पाचा ठेकेदार काही कारणास्तव प्रकल्प चालविण्यास फारसा उत्सूक नसून गेल्या काही दिवसांपासून हा प्रकल्प बंद असल्यामुळे शहरात कचरा समस्या निर्माण झाल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातून जमा होणारा कचरा आणला जातो आणि त्यानंतर तो डायघर प्रकल्पाच्या ठिकाणी नेला जातो. परंतु हा प्रकल्प बंद असल्यामुळे सीपी तलाव हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग लागले असून त्याचबरोबर शहरात कचरा समस्या निर्माण झाली आहे. या कचरा कोंडीवर मात करण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली असून त्याचबरोबर ठेकेदाराने प्रकल्पातून माघार घेण्याची तयारी दाखविली आहे. तसेच प्रकल्प खर्चापोटी केलेले पैसे देण्याची मागणी केली आहे.

या प्रकल्पाचा आराखडा उतराखंडच्या रुडकी आयआयटीने तयार केला होता. त्यावेळी ८९ कोटी रुपये प्रकल्प खर्च मांडला होता. त्यामुळे याप्रकल्पासाठी ठेकेदाराचे नेमके किती पैसे खर्च झाले, याचा हिशोब करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई आयआयटीचे पथक नेमले जाणार असून त्यासाठी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Story img Loader