शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत मुबलक पाणी; जलकुंभ निर्मितीच्या अमृत योजनेलाही मंजुरी
मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्यात झालेली वाढ आणि जलकुंभ निर्मितीच्या अमृत योजनेला मंजुरी यामुळे वसईकरांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. सूर्या पाणीपुरवठा योजनेचे सर्व पंप सुरू झाल्याने वसईकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. पेल्हार धरणात ६३ टक्के, उसगाव धरण ५० टक्के, तर सूर्याच्या धामणी बंधाऱ्यात ३८ टक्के पाणीसाठा वाढला आहे. अमृत योजनेमुळे जलसंवर्धन वाढणार असल्याने पाणीप्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
वसई-विरार शहराला सूर्या योजना, पेल्हार आणि उसगाव धरणातून १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो. सूर्या धरणातून सर्वाधिक १०० दशलक्ष लिटर, तर उसगावमधून २०, तर पेल्हारमधून १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. विरारच्या पापडखिंड धरणातून एक दशलक्ष लिटर पाणी मिळते, परंतु गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. धरणे पूर्ण भरली नसल्याने पाणीकपात करण्यात आली होती. सध्या जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून वसईत मुसळधार पाऊस होत आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस पडला असून वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक राहिलेला आहे.
वसईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा भरपूर आहे, परंतु पाणी साठविण्याचीे आणि त्याचे वितरण करण्याची सोय नव्हती. त्यासाठी वसई-विरार महापालिकेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राबविली जाणारी १३० कोटी रुपयांची अमृत योजना मंजूर करून घेतली आहे. पुढील आठवडय़ात त्याच्या निविदांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. या योजनेंतर्गत २१ जलकुंभ, जलकुंभात पाणी चढविणारे ५८ किलोमीटरचे फीडरमन तसेच सुमारे अडीचशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे. यामुळे पाणी साठविण्याची अडचण दूर होणार असून शहरातले पाणी वितरण सुरळीत होणार असल्याचे नगरसेवक आणि माजी पाणीपुरवठा सभापतीे प्रफुल्ल साने यांनी सांगितले. या योजनेचा ५० टक्के खर्च केंद्र सरकार, २५ टक्के खर्च राज्य सरकार आणि उर्वरित २५ टक्के खर्च पालिका करणार आहे.
पाणी वितरणाची सोय नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता, परंतु पाणी एकदिवसाआड जरी असले तरी ते दोन दिवसांचे पाणी एक दिवसात दिले जाते, असे ते म्हणाले. अमृत योजनेंतर्गत जलकुंभ आणि जलवाहिन्यांचे काम १२ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे वसईचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे ते म्हणाले.
सूर्या टप्पा-२चे पाणी ९० दिवसांत
शंभर दशलक्ष लिटरच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या कामातील अडथळे दूर झाले असून येत्या ९० दिवसांत ते पाणी मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. संरक्षित अभयारण्यातील झाडे कापण्यास ना-हरकत प्रतिज्ञापत्र वन खात्याने हरित लवादाला दिल्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. मुसळधार पावसाने धरणाचा साठा वाढलेला आहे. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.
धरणातील पाणीसाठा
- सूर्या धरण (धामणी बंधारा) : १०६.५६३ मीटर (३८ टक्के)
- उसगाव धरण : २.४८६ मीटर (५० टक्के)
- पेल्हार धरण : २.२७७ मीटर (६३ टक्के)