कल्याण – परीक्षांचा हंगाम सुरू आहे. शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या वाटेवर तर विद्यार्थी परीक्षा जवळ आल्या म्हणून अभ्यासात मग्न आहेत. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने बुधवार आणि गुरुवार असा दोन दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील शिक्षक, पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालिका शिक्षण विभागाने बुधवार, गुरूवार दोन दिवस आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संध्याकाळी चार वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सरकारी, खासगी, निमशासकीय शाळांंमध्ये अशाप्रकारचे बहुतांशी कार्यक्रम डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत उरकले जातात. मग कल्याण डोंबिवली पालिकेचा शिक्षण विभाग असे कार्यक्रम याच कालावधीत का घेत नाहीत, असे प्रश्न पालक, शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत.

या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पालिका शाळांमधील शिक्षक, सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी यांना गाणी, नाच यांची तालीम करणे यासाठी वेळ द्यावा लागतो. या कालावधीत परीक्षा जवळ आली असुनही अभ्यास दूर ठेवावा लागतो. या कार्यक्रमात आपल्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक यांना मेहनत घ्यावी लागते. सकाळी शाळेच्या वेळेप्रमाणे पालिका शाळेत हजर राहायचे. विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा. पुन्हा संध्याकाळी सहभागी विद्यार्थी घेऊन अत्रे मंदिर येथे जायाचे. ही सगळी धावपळ शिक्षकांना करावी लागत असल्याने पालिका शाळांमधील शिक्षक खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची फरफट होत आहे.

अत्रे रंगमंदिरातील कार्यक्रम वेळेवर सुरू झाला नाहीतर पुन्हा कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहचपणे शिक्षकांसमोर आव्हान असते. या सगळ्या गोष्टींचा विचार न करता शिक्षण विभागात बसलेले अधिकारी परीक्षा हंगामाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करत असल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रस्तावित असलेला निधी ३१ मार्चपूर्वी संपविण्यासाठी असे उपक्रम घाईघाईत घेतले जातात, असे एका विश्वसनीय सुत्राने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करणे, त्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा यामागील उद्देश आहे.- विजय सरकटे, शिक्षणाधिकारी, कडोंमपा, शिक्षण विभाग.