१५ बारना टाळे ठोकण्याची कारवाई; पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर पालिकेला उपरती
ठाणे : पहाटेपर्यंत सुरू असलेल्या लेडीज बारचे प्रकरण चार पोलीस अधिकाऱ्यांना भोवल्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून शहरातील डान्स बारचा शोध घेऊन त्यांना टाळे ठोकण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत दिवसभरात १५ बारना टाळे ठोकण्यात आले आहे. करोनाचे निर्बंध झुगारणाऱ्या आणखी काही बारचा शोध महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केला असला तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी चर्चा रंगली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत करोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या र्निबधांनुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. दुपारी चार वाजेनंतर पोलिसांची पथके शहरात गस्त घालतात आणि त्यावेळेस दुकान सुरू असेल तर ते बंद करण्यास सांगतात. तसेच दुपारी चार वाजेनंतर दुकान सुरू असल्याचे आढळून आले तर पालिकेकडून संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. असे असतानाच शहरातील लेडीज बार मात्र पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याची बाब नुकतीच उघड आली असून यासंबंधीची चित्रफीत समाजमाध्यमांवरही प्रसारित झाली आहे. या बारकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन सहायक पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्यात आले असून त्याचबरोबर करोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन बारला टाळे लावण्याची सूचना ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.
शहरातील बार पहाटेपर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत. या मुद्दय़ावरून पालिका प्रशासनावरही टीका होऊ लागली आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील सर्वच लेडीज बारला टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महापालिका अतिक्रमण पथकाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या पथकाने मंगळवारी शहरातील १५ बारला टाळे ठोकले आहे. याशिवाय शहरातील इतर लेडीज बारचा शोध घेण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.
बारचा मुद्दा पुन्हा चर्चेत
सहा वर्षांपूर्वी ठाणे शहरातील बेकायदा लेडीज तसेच अन्य बारविरोधात कारवाई करताना ठाणे पोलिसांना या बारमध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. बारबाला तसेच ग्राहकांना लपण्यासाठी तयार केलेल्या ‘खोल्या’ दाटीवाटीने उभारल्या गेल्याची बाबही पोलिसांच्या निदर्शनास आली होती. या बारमध्ये आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन ठाण्याचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही लक्ष्मीनारायण यांनी शहरातील अशा ५२ बारची यादी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आसीम गुप्ता यांना दिली होती. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन बेकायदा बारचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २८ बार जमीनदोस्त केले होते. बारमालकांनी न्यायालयात धाव घेऊन कारवाई थांबवली होती. दरम्यान, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत उर्वरित बारवर हातोडा मारला होता. त्यामुळे सहा वर्षांनंतर आता पुन्हा लेडीज बारचा मुद्दा चर्चेला आला आहे.
कोणत्या बारवर कारवाई?
ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापूरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाइट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अॅन्जेल बार, उपवन येथील सूर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाडय़ातील मनीष बार, ओवळ्यातील मैफील बार, कापूरबावडी येथील सनसिटी बार.
ठाणे शहरातील लेडीज बार रात्री उशिरापर्यंत छुप्या पद्धतीने सुरू ठेवले जात असून या ठिकाणी गर्दीही होत आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी येत होत्या. तसेच पोलिसांनीही याबाबत कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शहरातील १५ बारला टाळे लावण्याची कारवाई केली आहे. याशिवाय शहरात लेडीज बार सुरू आहेत का, याचा शोध सुरू असून त्यालाही टाळे ठोकण्यात येईल.
– अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका