डोंबिवली – आधुनिक वाल्किमी ‘गदिमा’ लिखित गीतरामायण रचनेला आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या गीतरामायण गायनाला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गीतरामायणातील गीत रचनांवर आधारित डोंबिवलीतील २५० नृत्य कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. १५ नृत्य संस्थांचे कलाकार या नृत्याविष्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. गीत रामायणातील २० गीतांच्या माध्यमातून नृत्य कलाकारांनी विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करत रामकथा उलगडत गेली.
या अनोख्या कार्यक्रमाची ऑस्ट्रेलियामधील वर्ल्ड वंडर बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद करण्यात आली. रामनवमीचे औचित्य साधून एकलव्य आर्ट फोरम, श्री कला न्यास व दिवंगत मधुकर चक्रदेव हफ यांनी ‘त्रिवार जयजयराम रामा’ या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले होते.
डोंबिवली १५ नृत्य संस्थांमधील २५० कलाकारांनी या नृत्यमय रामकथेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. जागतिक पातळीवरील विक्रम नोंदीसाठी निवड झालेल्या या कार्यक्रमाचे थेट ऑस्ट्रेलियात प्रक्षेपण करण्यात आले. ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती’ या गीतरामायणातील गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. उत्तरोत्तर कसलेल्या २५० नृत्य कलाकारांनी गीतरामायणातील अविट गाण्यांवर विविध नृत्याविष्कार सादर करून रामकथा उलगडत नेली.
‘गा बाळांनो श्री रामायण’ या गीताने कार्यक्रम टिपेला गेला. व्यासपीठावर प्रसंगानुरूप भावलय, पदन्यास, मोहक हस्तमुद्रा राम जन्माचा पाळणा, रामाचे शिवधनुष्य, स्वयंवर सितेचे, स्वयंवराचा थाटमाट, सेतू बांधणी, सूड घे लंकापती हे चवताळून केलेले नृत्य, रावणाचा थयथयाट, राम रावण युध्द, बालक लवं कुश या नृत्याविष्कारातील चित्रमयतेमुळे व्यासपीठावर रामायण काळ अवतरला होता.
आस्ट्रेलियातील या कार्यक्रमाच्या परिक्षकांनी डोंबिवलीतील या रामकथेवरील नृत्याविष्कार कार्यक्रमाची जागतिक आश्चर्य विक्रमी कार्यक्रमात नोंद झाल्याचे जाहीर करताच नृत्याविष्कार आयोजक संस्था आणि कलाकारांनी जल्लोष केला. उपस्थितांनी आयोजक संस्था पदाधिकारी आणि कलाकारांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायक वसंतराव आजगावकर, ज्येष्ठ गायक निनाद आजगावकर, गणेश मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे, कल्याण डोंबिवली पालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, एकलव्य आर्ट फोरमच्या संचालिका ॲड. सुनिला पोतदार, श्री कला संस्कार न्यासाच्या ज्योती बेहरे, दीपाली काळे, मधुकर चक्रदेव हफच्या अंजली चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार मीना गोडखिंडी उपस्थित होते. यावेळी १५ आयोजक संस्थांच्या नृत्य गुरूंचे सन्मान करण्यात आले.
गीतरामायणावरील हा भरगच्च कलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्काराचा कार्यक्रम पाहून आपण भारावून गेलो आहोत. आपले शब्द अबोल झालेत. नृत्याविष्कारातून रामकथा उत्तमपणे उलगडता येते हे आयोजक नृत्य संस्था, कलाकारांनी दाखवून दिले. संघटित भावनेचा उत्तम नमुना म्हणजे हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम. – वसंत आजगावकर, ज्येष्ठ गायक. डोंबिवली.
फोटो ओळ
डोंबिवलीतील रामकथेच्या कार्यक्रमात सहभागी झालेले २५० नृत्य कलाकार.