ठाणे : ठाण्यात अपघातांचे सत्र सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांचा धोका देखील समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्व द्रूतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागातील जवळपास प्रत्येक चौक, पूल अपघात प्रवण क्षेत्र आहेत. अपघात प्रवण क्षेत्रात तीन हात नाका, नितीन कंपनी, माजिवडा या महत्त्वाच्या चौकांचाही सामावेश आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टप्प्यावर जीवघेणा प्रवास असल्याचे दिसून येत आहे.

नेत्रदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातानंतर ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर अपघात कमी व्हावे यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग (माजिवडा ते आसनगाव), घोडबंदर रस्ता, पूर्व द्रूतगती महामार्ग (कोपरी ते माजिवडा), शीळफाटा हे महत्त्वाचे रस्ते जातात. भिवंडी भागात गोदामे आहेत. त्यामुळे गुजरात, नाशिक, उरण जेएनपीटी यासह विविध भागातून जड-अवजड वाहनांची वाहतुक ठाणे जिल्ह्यातून होत असते. तसेच जिल्ह्यात नागरिकरण वाढल्याने हलक्या वाहनांचा भारही राज्य आणि रस्ते मार्गांवर वाढला आहे. त्यातच आता अपघातांच्या प्रकरणांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच ठिकाणी तीन वर्षात झालेल्या अपघातामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंचा मृत्यू झाल्यास त्या जागेला वाहतूक पोलिसांकडून अपघातप्रवण क्षेत्र घोषित केले जाते. २०२२ मध्ये अपघातप्रवण क्षेत्रांची नोंदणी करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात ज्या मार्गांवर अधिक वाहतूक होते. ते रस्तेच अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक गजबज असलेल्या तीन हात नाका, नितीन कंपनी आणि माजिवडा या मुख्य चौकांचाही सामावेश आहे. त्यामुळे अपघात प्रवण क्षेत्रांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

कोठे अपघातप्रवण क्षेत्र

पूर्व द्रूतगती महामार्ग – तीन हात नाका, नितीन कंपनी, कोपरी पूल

मुंबई नाशिक महामार्ग – माजिवडा, मानकोली नाका, दिवा गाव, खारीगाव पूल, पिंपळास फाटा, रांजनोली नाका.

जुना आग्रा रोड – कशेळी, धामनकरनाका.

घोडबंदर – गायमुख, ओवळा, वाघबीळ, कापूरबावडी पेट्रोल पंप जवळ, ब्रम्हांड सिग्नल.

शीळ मार्ग- कल्याणफाटा, शीळफाटा.

मुंब्रा- रेतीबंदर

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर- आनंदनगर , ओरडेन्स फॅक्ट्री.

मानपाडा रोड- टाटा नाका, विको नाका.

मागील दोन वर्षांमध्ये प्राणांकित अपघातांमध्ये घट झाली असल्याचे आमचे निरीक्षण आहे. अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी आम्ही सर्वच यंत्रणा प्रयत्न करत आहोत. – अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे.

Story img Loader