|| निखिल मेस्त्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोडकळीस आलेली ५० वर्षे जुनी वसाहत डागडुजीच्या प्रतीक्षेत; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

पालघर नगर परिषदेत असलेले सफाई कर्मचारी मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेले आहेत. अनेक वर्षांपासून हे कर्मचारी गोठणपूर परिसरात असलेल्या नगर परिषद वसाहतीत राहत आहेत. सुमारे ११ खोल्यांची ही वसाहत डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. या वसाहतीची पडझड झाली असून जीव मुठीत घेऊन हे कर्मचारी राहत आहेत. त्यामुळे सफाई कामगारांना नगर परिषदेने नवीन वसाहत बांधून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

पालघर ग्रामपंचायत अस्तित्वात असताना येथे ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी राहत होते. १९९८ मध्ये पालघर नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर हे कर्मचारी नगर परिषदेचे सफाई कर्मचारी म्हणून सेवेत रुजू झाले. ही वसाहत ५० वर्षांपासून उभी आहे. ग्रामपंचायतच्या वेळी बांधलेल्या या वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. भिंती पोकळ झाल्या आहेत. दरवाजे तुटलेले आहेत. आंघोळीसाठी व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत हे सफाई कर्मचारी या वसाहतीत राहत आहे.

नगर परिषदेच्या क्षेत्रात साफसफाई करणारे हे कर्मचारी वसाहतीच्या सुविधांपासून वंचित आहेत. या वसाहतीकडे नगर परिषदेने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वतीने येथील स्थानिक नगरसेवक दिनेश बाबर आणि शेरबानू मेमन यांनी याप्रकरणी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या या समस्या घेऊन पत्रव्यवहारही केला आहे, परंतु याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.

पालघर नगर परिषद स्थापन झाल्यापासून नगर परिषदेने शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र याच नगर परिषदेने स्वत:चे असलेले आणि पालघर स्वच्छ करणारे सफाईकाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. या कर्मचारी वसाहतची जीर्णावस्था झाली असून पावसात या छोटय़ा खोल्यांमध्ये गुडघाभर पावसाचे व बाहेरचे पाणी घरात शिरते. यामुळे घरात असलेल्या सामानाची हानी होते. याकडे नगर परिषदेने लक्ष देण्यासाठी स्थानिक नगरसेवक दिनेश बाबर व शेरबानू मेमन यांनी प्रशासनास पत्र दिले असून स्थापनेच्या आधीपासून हे कर्मचारी या वसाहतीत राहत असून आता या वसाहतींची दयनीय अवस्था झाली आहे. या कुटुंबांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. हे कर्मचारी संपूर्ण पालघर परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहे. आम्ही आधीही नगर परिषदेचे सदस्य असताना या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सभागृहात विषय मांडून आवाज उठवला होता. मात्र आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यांना योग्य सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगर परिषदेने तात्काळ लक्ष घालावे, तसेच या जीर्णावस्था झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या या वसाहतीत एखादी आपत्ती ओढवून त्या दुर्घटनेत एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार नगर परिषद असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

जे सफाई कर्मचारी संपूर्ण शहराची सफाई करतात अशाना चांगले राहणीमान देण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे. मी नवनिर्वाचित नगराध्यक्ष या नात्याने त्यांची वस्ती सुधारण्यासाठी पूर्णत: प्रयत्नशील राहीन.     – डॉ. उज्जवला केदार काळे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष

आमच्या कुटुंबासह आम्ही येथे राहतो. वसाहतीची अवस्था वाईट झाली आहे. इतक्या वर्षांत आजतागायत कोणीही लक्ष दिलेले नाही.    – हसमुख सोलंकी, सफाई कर्मचारी

घरातील बारीकसारीक दुरुस्ती स्वत:च्या खर्चाने करावी लागत आहे. इतक्या वर्षांत या वसाहतीची बऱ्याचदा पाहणी झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र वसाहतीसाठी प्रशासनाने काहीच केलेले नाही.   – मधु बरिया, सफाई कर्मचारी