भीतीच्या छायेत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे कामकाज

अत्यंत धोकादायक बनलेल्या वाडा पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारतीचे दुरुस्तीचे काम गेल्या चार महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. अशा स्थितीतही कर्मचारी जीव मुठीत घेऊन कामकाज करीत आहे. याच गतीने दुरुस्तीचे काम सुरू राहिले तर पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वाडा पंचायत समितीच्या कार्यालयाची संपूर्ण इमारत धोकादायक झालेली आहे. असे असतानाही तिच्यावर दुरुस्तीपोटी दर वर्षी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. या वर्षी दुरुस्तीवर तब्बल २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. चार महिन्यांत दुरुस्तीचे काम २५ टक्केही झालेले नाही. उर्वरित काम महिनाभरात कसे होणार ही भीती या इमारतीच्या तळमजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्याचे व छताचे दुरुस्तीचे काम सुरू आहे.  पहिल्या मजल्यावर बांधकाम, पाणीपुरवठा, कृषी तसेच पाटबंधारे विभाग यांची कार्यालये आहेत. कर्मचारी निवासस्थानी हलविण्यात आली आहेत. तळमजल्यावर सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन, शिक्षण विभाग व महिला बाल कल्याण विभाग यांची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांत पन्नासहून अधिक कर्मचारी बसतात. तसेच तालुक्यातून विविध कामांसाठी दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते.

इमारत दुरुस्ती कामाचा सर्वाधिक फटका तळमजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. दुरुस्तीसाठी या इमारतीचे पूर्ण छप्पर उघडण्यात आले आहे. काम संथगतीने सुरू राहिले तर पावसाळ्यात संपूर्ण कार्यालयाला गळती लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यालयासमोर ध्वजारोहणास उपस्थित असलेल्या कर्मचारी, पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये या संभाव्य धोक्याचीच चर्चा सुरू होती.

ज्या ठेकेदाराकडे इमारत दुरुस्तीचे काम दिले आहे. त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे इमारत दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. याबाबत सदर ठेकेदारास तीन नोटीसा दिल्या आहेत.   – धनंजय जाधव, उपअभियंता, पंचायत समिती बांधकाम विभाग

Story img Loader