ठाणे: पाऊस आणि वारा नसतानाही वृक्ष पडून तीन जण जखमी झाल्याची घटना काही दिवसांपुर्वीच घडली असून या घटनेनंतर हे वृक्ष बाहेरून सुस्थितीत दिसत असले तरी ते आतून पोखरलेले असल्याची बाब वृक्ष प्राधिकरण विभागाच्या निदर्शनास आली होती. असे धोकादायक वृक्ष नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाने आता अशा वृक्षांचा शोध घेण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याचा विचार सुरु केला आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे अशा वृक्षांचा शोध घेणे शक्य होत असून हेच तंत्रज्ञान वापरण्याचा विचार प्राधिकरणाच्या पातळीवर सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दीपोत्सवानिमित्त डोंबिवलीत एक हजार लीटर खाद्यतेल जमा करण्याचा संकल्प

ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने यंदा पावसाळ्यापुर्वी शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. हे सर्व वृक्ष पालिकेने काढून टाकले होते. त्यानंतरही पावसाळ्यामध्ये शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच होते. गेल्या चार महिन्यात शहरात शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडत असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून केले जात होते. परंतु  पाऊस आणि वारा नसतानाही वृक्ष पडून तीन जण जखमी झाल्याची घटना ठाण्यात काही दिवसांपुर्वीच घडली. ठाणे येथील सिडको बस थांबा परिसरात नागरिक आणि वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. याच भागातील साई बाबा मंदिराशेजारी उभ्या असलेल्या फालुदा विकणाऱ्या हात गाडीवर हे वृक्ष पडले होते. या घटनेमुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : २० हून अधिक रिक्षा चालकांना दंड, जप्तीची कारवाई

ठाणे येथील सिडको बस थांबा परिसरातील साई बाबा मंदिराशेजारी हातगाडीवर वृक्ष पडल्याच्या घटनेनंतर वृक्ष प्राधिकरण विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. या विभागाने त्या वृक्षाची पाहाणी केली असता, त्यात काही बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. हे वृक्ष बाहेरून सुस्थितीत दिसत होते. परंतु ते आतुन पुर्णपणे पोखलेले होते. यामुळेच हे वृक्ष कोसळले असल्याची बाब वृक्ष प्राधिकरण विभागाच्या निदर्शनास आली आहे. शहराच्या इतर भागातही असे वृक्ष असण्याची शक्यता वर्तविली जात असून असे वृक्ष नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांमार्फत किंवा खासगी तज्ज्ञांमार्फत जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून अशा वृक्षांचा शोध घेतला जातो. त्यामुळे या तज्ज्ञांमार्फतच अशा वृक्षांचा शोध घेण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याचा विचार वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सुरु आहे. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त मारुती खोडके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous trees surveyed municipality plans german technology detection of dangerous trees ysh