बालनाटय़ म्हटले की डोळयासमोर उभी राहतात ती दिवाळी, उन्हाळी सुट्टय़ांमध्ये घेतली जाणारे शिबिरे. मुलांना अभिनयाचे धडे देणे, तसेच त्यांना रंगमंचावर नाटक सादर करण्याची संधी देणे, यातून मुलांना आनंद तर मिळतोच, परंतु हीच मुले जेव्हा दिग्दर्शनाचे काम करतात तेव्हा मात्र तेव्हा खऱ्या अर्थाने या शिबिरांचे महत्त्व लक्षात येते. सध्या ठाण्यातील ‘ज्ञानदीप कलामंच’चे सर्वेसर्वा राजेश राणे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डराव डराव’ या नाटकाची महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत डराव डराव या नाटकाने बाजी मारली असून सर्वत्र या टीमचे कौतुक होत आहे.
गेले वर्षभर ठाण्यात या बालनाटय़ाची चर्चा सुरू आहे. ‘डराव डराव’ या बालनाटय़ातून नेमका कोणता संदेश देण्यात आला आहे, याबाबत दिग्दर्शक राजेश राणे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण झाली. खेडय़ापाडय़ात दुष्काळ पडू लागला होता, हेच वास्तव समाजासमोर प्राण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. नाटकातील बेडकांनी माणसाला झाडे लावा, झाडे जगवा असा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाचे लेखक विजय सुलताने यांनी नेमकेपणाने ‘डराव डराव’चे लिखाण केले असून संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शन मी केले असल्याचे राजेश राणे यांनी नमूद केले.
यात अर्पिता जोशी, वेदांगी आठवले, वेदश्री तांबोळी, यश सलागरे, सई डिंगणकर, मनश्री पालकर, भावेश देसाई, ऋत्विक कालेकर, सिद्धेश गुंजाळ या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. सर्वात प्रथम १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाटय़ स्पर्धेत उपान्त्य फेरीत दुसरा क्रमांक या बालनाटय़ाला मिळाला. अंतिम फेरीतही उत्कृष्ट असा अभिनय मुलांनी करून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनातही ‘डराव डराव’ हे बालनाटय़ सादर करण्याची संधी मिळाली. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या बालनाटय़ महोत्सवातही या नाटकाने प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पटकाविले.
१३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाटय़ स्पर्धेत ‘डराव डराव’ या बालनाटय़ाने उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, अभिनय, रंगभूषा, नेपथ्य, लक्षवेधी भूमिका अशी अनेक पारितोषिके पटकाविली. यातील सर्व कलाकार हे ठाणेकर आहेत. शाळेचा अभ्यास करून ही मुले दर शनिवार व रविवारी ज्ञानदीप कलामंचच्या माध्यमातून अभिनयाचे धडे घेतात. ‘डराव डराव’ या नाटकाला मिळालेला रसिकांचा प्रतिसाद, विविध ठिकाणी मिळालेली पारितोषिके आणि मान्यवरांची कौतुकाची थाप यामुळेच की काय या मुलांमध्येही एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आहे. स्टेजवरील लेवल, ब्लॅकआऊट, कट असे रंगभूमीवरील शब्द या मुलांच्या तोंडी ऐकायला मिळतात. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. या सुप्त गुणांना बाहेर काढून त्यांना राजेश राणे यांनी वाव दिला असल्याची प्रतिक्रिया शिबिरार्थींचे पालक व्यक्त करतात. फक्त दिवाळी, उन्हाळी सुट्टय़ांपेक्षा दर आठवडय़ाला मुलांकडून या गोष्टी करून घेतल्या जात असल्यामुळे मुलांनाही शनिवार- रविवार या दिवसांची ओढ लागलेली दिसून येते. शाळा, अभ्यास आणि अभ्यासाबरोबरच अभिनय याशिवाय अन्य इतर कला जोपासताना हे शिबिरार्थी दिसतात.
कोणतीही कला अंगभूत असली की तिचा वापर हा होतच असतो. फक्त या कलांना जोड हवी असते ती मार्गदर्शनाची. आज या कलामंचचे विद्यार्थी जेव्हा एकमेकांमध्ये एखाद्या विषयावर छोटे छोटे नाटकाचे सीन बसवितात तेव्हा त्यांच्या कल्पनाशक्तीला निश्चितच वाव मिळतो. हाच आत्मविश्वास देण्याचे काम राजेश राणे हे नेमकेपणाने करीत आहेत. येत्या राज्य नाटय़स्पर्धेतही ज्ञानदीप कलामंच सहभागी होणार असून त्या दृष्टीने शिबिरार्थीची तयारी सुरू आहे. या शिबिरात नवोदितांनाही संधी देण्यात येणार आहे. नाटकाचे इम्प्रोव्हायजेशन, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, संगीत या घटकांचा वापर, हौशी राज्य नाटय़, बालनाटय़ व एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला जाणार आहेत. मुलांची मानसिक तयारी, कल्पनाशक्तीचा विकास, आवाजाचे व्यायाम, बोलण्यातले दोष दूर करणे, स्पष्ट आणि खणखणीत आवाजाचे तंत्र, रंगमंच आणि कॅमेऱ्यासमोरील तयारी करून घेतली जाते.