डोंबिवली – येथील एमआयडीसी भागातील डोंबिवली जीमखान्या जवळील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात रात्रीच्या वेळेत अंधार असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. राज्याच्या विविध भागांतील बस या स्थानकातून येजा करतात. रात्री नऊनंतर स्थानकात कोणीही कर्मचारी नसल्याने प्रवाशांना बस वेळेची माहिती मिळत नाही, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
डोंबिवली बस स्थानक शहराच्या एका बाजूला आहे. रात्रीच्या वेळेत अनेक प्रवासी एकट्याने, कुटुंबासह या स्थानकातून प्रवासासाठी येतात. बस स्थानक कार्यालयातील विजेचे दिवे बंद असल्याने बसची वेळ, स्थानकात बसायचे कुठे असा प्रश्न प्रवाशांसमोर उपस्थित होत आहे. स्थानकातील पथदिव्यांच्या उजेडात प्रवासी उभे राहून बसची वाट पाहतात. अनेक वेळा स्थानकात एक ते दोन प्रवासी रात्रीच्या वेळेत असतात. त्यांना गर्दुल्ले, लुटारू यांची भीती असते. रात्रीच्या वेळेत अनेक भागांतून आलेले प्रवासी डोंबिवली बस स्थानकात उतरतात. स्थानकातील अंधारामुळे त्यांची कुचंबणा होते.
हेही वाचा – वसईत अधोविश्व सक्रीय? २ कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या ऑफीसवर हल्ला, ३ जखमी
नाशिक, नगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, औरंगाबाद याशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी वेगळ्या आगारातून येणाऱ्या बस या स्थानकातून ये-जा करतात. या महत्वपूर्ण वर्दळीच्या बस स्थानकात रात्रीच्या वेळेत विजेचे दिवे बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. रात्रीच्या वेळेत डोंबिवली बस स्थानकात एक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षकाची व्यवस्था परिवहन विभागाने करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हेही वाचा – ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आज गुंतवणुकीचे दिशादर्शन
डोंबिवली बस स्थानकाच्या बाहेर बंगल्यांची वस्ती आहे. रात्रीच्या वेळेत या भागात शुकशुकाट असतो. बस स्थानकात रात्रीच्या वेळेत येणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहत थांबावे लागते. परिवहन महामंडळाने बस स्थानकाच्या प्रवेशव्दारापासून ते अंतर्गत भागात विजेचे दिवे रात्रीच्या वेळेत चालू राहतील यासाठी व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांची आहे.