दिवा स्थानकाच्या फलाटावर मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. प्रवासी शिव्यांच्या लाखोल्या वाहत होते. धिम्या मार्गावर एकही लोकल गाडी धावत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. गर्दीने संतापलेला दिवेकर रेल्वे रुळांवर उतरू लागले. मुंबईकडे एकही गाडी जाऊ द्यायची नाही, असा आवाज गर्दीतून आला आणि दिवा भडकला.. या घटनेला गुरुवारी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना या काळात दिवेकरांच्या पदरी आश्वासनांच्या पलीकडे नेमके काय पडले याचे उत्तर पुन्हा नकारात्मक येऊ लागले आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्थानकातील गर्दी ओसंडून वाहत होती. खच्चून भरलेल्या लोकलमध्ये शिरायला जागा नव्हती. स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ होती. बेकायदा फेरिवाल्यांच्या गर्दीत पालकमंत्र्यांची गाडीही काही काळ अडकली.
बुधवारी सकाळी नऊ वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने दिवा स्थानकाच्या परिस्थितीचे अवलोकन केले असता सहा महिन्यांपेक्षा येथील समस्या आणखी वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिवा स्थानकातील फलाटांवर गर्दी गेल्या काही महिन्यांत वाढली असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला. धिम्या मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याने येणाऱ्या गाडय़ांमध्ये प्रवासी भरभर चढून फलाट रिकामा होत असला तरी लोकलमध्ये चढण्यासाठी करावी लागणारी ‘कसरत’ कमी झालेली नाही.
दिवा आंदोलनास सहा महिन्यांचा कालावधी होत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी येथे दौरा आयोजित केला होता. या वेळी फलाटावर रेल्वे अधिकारी आणि तिकीट तपासनीसांची मोठी गर्दी उसळली होती. स्वच्छतागृहाजवळची घाण साफ करून त्यावर जंतुनाशक पावडर फवारण्यात आली होती. खासदारांना माहिती देण्यात अधिकारी वर्ग गर्क होता.
माध्यमांची मोठी गर्दी या सगळ्याचे चित्रीकरण करत होती. एकूणच दिव्याला महोत्सवी स्वरूप आले होते. खासदारांनी पाचव्या-सहाव्या मार्गिका, पूल, फलाटांची पाहणी केली. यानंतर हा ताफा ठाण्याकडच्या फलाटावरून दिव्याच्या पूर्व दिशेला सरकला. पालकमंत्र्यांची गाडी स्थानकाबाहेर उभी होती. मात्र तेथील फळवाल्यांची गर्दी,  रिक्षावाले, छोटय़ा गाडय़ा आणि अवजड वाहनांच्या गर्दीत अडकून पडली. पालकमंत्र्यांचा मार्ग मोकळा करून देताना पोलिसांची दमछाक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा