रेल्वे प्रवाशांसाठी लोकल रेल्वेप्रती ऋण व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवसाकडे पाहिले जाते. मंगळवारी दसऱ्याच्या आदल्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला. सकाळी साडेपाच वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल प्रवासी संघटनांकडून सजवल्या जात होत्या. बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलचे पूजन करून महिलांना काही मिनिटांसाठी ठेका धरत भोंडला खेळला. यावेळी मोटरमन, स्थानक व्यवस्थापक, रेल्वे पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा- उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद
मुंबई आणि परिसरातील लोकांसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईन आहे. दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ८० लाखांपेक्षा जास्त लोकं प्रवास करतात. ही लोकल ट्रेन या लाखो लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे. म्हणूनच दसऱ्याच्या आधी एक दिवस लोकल ट्रेन सजवत, तिची पूजा करत करण्याची प्रथा गेली अनेक वर्षे सुरु आहे. म्हणूनच आज मुंबई आणि परिसरातील सर्वच लोकल ट्रेन अशा सजलेल्या बघायला मिळत आहेत.