ठाणे : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याची ठाणे न्यायालयाने खंडणी प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने २०१५ मध्ये बोरीवलीतील गोराई येथे ३८ एकरची जमीन घेतली होती. यासंदर्भात जमीन मालक आणि व्यावसायिकामध्ये करार झाला. मात्र काही कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाला हा करार पूर्ण करता आला नव्हता. या कालावधीत जमीन मालकाने बांधकाम व्यावसायिकाकडे आणखी पैशांची मागणी केली. जमिनीचा भाव वधारल्याने जमीन मालकाने पैशांचा तगादा लावला. मात्र हा करार रद्द करताना दोन कोटी रुपये दिल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाने आणखी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी हा वाद जमिनीचा करार करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटपर्यंत पोहोचला. रिअल इस्टेट एजंटने या प्रकरणात इकबाल कासकरची मदत घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून इकबाल कासकर याला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

हेही वाचा – अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निविदा, ४३० खाटांच्या रुग्णालयाचीही उभारणी होणार

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘सुपरमॅक्स’ कामगारांचा ठिय्या ; एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

या प्रकरणाची अंतिम सुनावणी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर झाली. कासकर यांच्यावर केलेले आरोपाचे सबळ पुरावे पोलीस न्यायालयात सादर करू शकले नाही. साक्षीपुराव्या अभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे अशी माहिती कसकर याचे वकील पुनीत माहिमकर यांनी दिली.