गेल्या दोन-तीन आठवडय़ांपासून मुंबईकरांमध्ये हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाबाबत चर्चा सुरू आहे. डीसी-एसी परिवर्तन म्हणजे नेमकं काय झालं, त्याचा मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होणार आदी विविध गोष्टींबाबत बहुतांश मुंबईकर अनभिज्ञ आहेत. काहींच्या मते या परिवर्तनात काहीच तथ्य नाही. पण बारकाईने विचार केला असता हे परिवर्तन म्हणजे दीर्घकालीन उपाय ठरणार आहे..
गेल्या शनिवारी लोकलमधून प्रवास करताना काही सहप्रवाशांमध्ये संवाद चालला होता. ते हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाबद्दल बोलत होते आणि विशेष म्हणजे ना ते बातमीदार होते आणि ना रेल्वेचे अधिकारी! ‘क्या फायदा होगा यह सब करकें.. उपरके वायरमें कौनसा करंट हैं, उससे पब्लिक को क्या लेना देना.. रेल्वेके बिजली का खर्चा बचेंगा खाली.. पब्लिक को कुछ फायदा नहीं होनेवाला..’ असा काहीसा साधारण सूर होता त्यांच्या गप्पांचा! केवळ याच गाडीतील नाही, तर अनेक गाडय़ांमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या बोलण्याचा सूरही हाच असेल. काही अंशी तो बरोबरही आहे. कारण एखादी नवीन गाडी आली, प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसवले, फेऱ्यांमध्ये वाढ झाली किंवा स्थानकाची रंगरंगोटी झाली, तर तो बदल दृश्य स्वरूपातला असतो. त्याचा थेट फायदा प्रवाशांना दिसत असतो. पण डीसी-एसी परिवर्तनाचा असा कोणताही थेट फायदा प्रवाशांना दिसत नाही. हा बदल जाणवण्यासाठीही गाडीच्या टपावरून प्रवास करावा लागतो आणि अर्थात तसं करणं प्राणघातक असेल. यातील गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी, डीसी-एसी परिवर्तनाबाबत रेल्वे अधिकारी एवढं भरभरून का बोलत आहेत, वर्तमानपत्रांमधून त्याबाबत का छापून येत आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
डीसी आणि एसी विद्युतप्रवाहाची तांत्रिक माहिती इथे सांगण्याचा अजिबातच हेतू नाही. ती अभियांत्रिकी पाश्र्वभूमी असल्याशिवाय समजावणं कठीण आहे. पण अगदी सोप्या शब्दांत वर्णन करायचं, तर तुमच्या पलंगाशेजारी असलेला लँप हा अल्टन्रेट करंटवर म्हणजेच एसी विद्युतप्रवाहावर चालतो. कारण त्यासाठी मिळणारा विद्युतपुरवठा हा कुठल्या तरी प्लगमधून वायरच्या माध्यमातून तुमच्या लँपपर्यंत पोहोचतो. पण तुम्ही समजा बुकलॅम्प किंवा तत्सम फ्लॅशलाइट वापरत असाल, तर तो विद्युतप्रवाह डायरेक्ट म्हणजेच डीसी असतो. तिथे बॅटरीद्वारे पुरवठा होतो. तुम्ही लॅपटॉप वापरताना डीसी आणि एसी असे दोन्ही विद्युतप्रवाह एकत्र वापरत असता. कारण लॅपटॉपची बॅटरी तुम्हाला थेट विद्युतपुरवठा करते. पण ती बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण चार्जर घरातल्या एखाद्या प्लगला लावतो. तेव्हा तो एसी अर्थात अल्टरनेट करंट असतो. आपल्या हातातला मोबाइल फोन हे डीसी विद्युतप्रवाहावर चालणारे उपकरण आहे. पण तोच फोन आपण चाìजगला लावतो, त्या वेळी त्यात एसी विद्युतप्रवाहाचाही वापर होतो.
याआधी रेल्वेमार्गावर विविध स्थानकांच्या बाजूला पॉवर सब-स्टेशन्स असल्याचं अनेकांनी बघितलं असेल. त्या स्टेशनबाहेरील िहदीतील ‘उपरी उपस्कर कर्षण सब-स्टेशन’ अशी पाटीही अनेकांना आठवत असेल. डीसी विद्युतप्रवाहावर गाडय़ा चालत असताना ही सब-स्टेशन्स ठिकठिकाणी ओव्हरहेड वायरला विद्युतपुरवठा करत होती. त्यामुळे काही ठरावीक अंतरावर ही सब-स्टेशन्स असणे आवश्यक होते. पण मुख्य मार्गावर डीसी-एसी विद्युत परिवर्तन झाल्यानंतर अनेकांनी पाहिलं असेल की, ही सब-स्टेशन्स मोठय़ा प्रमाणावर बंद करण्यात आली आहेत. हा रेल्वेचा मोठा फायदा झाला आहे.
डीसी-एसी परिवर्तन एवढं गरजेचं का होतं, हेदेखील समजून घ्यायला हवं. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर हे परिवर्तन होण्यापूर्वी देशभरात विद्युतीकरण झालेल्या सर्व रेल्वे मार्गापकी फक्त हे दोनच मार्ग डीसी विद्युतप्रवाहावर धावणारे होते. डीसी विद्युतप्रवाह हे जुने तंत्रज्ञान असून ते हळूहळू कालबाह्य़ होत आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. जगभरात तयार होणाऱ्या गाडय़ा एसी विद्युतप्रवाहावर धावण्यासाठी बनवल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईत त्या चालवताना डीसी-एसी अशा बदलून घ्याव्या लागतात. या गाडय़ांचा वेग जुन्या गाडय़ांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे एसी विद्युतप्रवाहावरील मार्गावर या गाडय़ा धावल्यास या मार्गावरील प्रवाशांना नक्कीच फायदा होऊ शकेल. सध्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स गाडय़ांचा वेग ताशी १०० किमीपर्यंत जाऊ शकतो. आता या गाडय़ा हार्बर मार्गावरही धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाडय़ांचा वेगही वाढणार आहे.
वेग वाढीमुळे हार्बर मार्गावरील वक्तशीरपणा सुधारण्यासही मदत होणार आहे. त्याशिवाय डीसी-एसी परिवर्तनामुळे ओव्हरहेड वायर उपकरणांमध्येही बदल करण्यात आले आहेत. परिणामी या मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये होणाऱ्या बिघाडांचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच या मार्गावर धावणाऱ्या जुनाट गाडय़ा हद्दपार झाल्याने प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. रेल्वेचा महसूलदेखील या एसी विद्युतप्रवाहामुळे वाढणार असल्याचे सांगितले जाते.
ही झाली डीसी-एसी परिवर्तनाची सकारात्मक बाजू. पण बदल काही फक्त सकारात्मक बाजू घेऊन येत नाहीत. मुख्य मार्गावर डीसी-एसी परिवर्तनानंतर प्रवासाचा वेळ कमी होईल, असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात डीसी-एसी परिवर्तनामुळे ठिकठिकाणी लागलेल्या वेगमर्यादांमुळे हा वेळ वाढला आहे. पूर्वी ठाणे-डोंबिवली हे अंतर जलद गाडीने १४ मिनिटांत कापले जात होते. आता पारसिक बोगद्यात लागलेल्या वेगमर्यादेमुळे या अंतरासाठी २० मिनिटे लागतात. हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरही चार ठिकाणी वेगाबाबत काळजी घेण्याबाबत सांगितले गेले आहे. त्यामुळे येथेही वेगमर्यादा असण्याची शक्यता आहे.
अर्थात हा काही काळाचा प्रश्न आहे. त्यामुळे नकारात्मक बाबींपेक्षा सकारात्म गोष्टी जास्त आहेत. तसेच भविष्य काळाकडे नजर टाकली असता रेल्वेगाडय़ांच्या परिचालनातील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी डीसी-एसी परिवर्तन मोठय़ा प्रमाणात निकडीचे ठरणार आहे. सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर केलेला हा तात्पुरता उपाय नसून तो दीर्घकालीन उपाय आहे.