ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ किंवा त्याहून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपसह दोन मित्रपक्षांबरोबर महाराष्ट्रात महाविजय मिळवण्याचा निर्धार फडणवीस यांनी पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आमची भावनिक, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी राजकीय मैत्री आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथील अंजूर परिसरात गुरुवारी भाजपच्या आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या सत्तासमीकरणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘‘लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, तर कुणी म्हणते मी घर फोडले. पण, याची सुरुवात कोणी केली’’, असा सवाल करीत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विचारपूर्वक भाजपबरोबर आले असल्याचे स्पष्ट केले.

‘‘एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरची युती ही भावनिक युती आहे. ती २५ वर्षांची आमची मैत्री आहे. आम्ही एका विचाराने बरोबर आलो आहोत. राष्ट्रवादीशी आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढील १० ते १५ वर्षांत तीही भावनिक मैत्री होईल’’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५, तर विधानसभा निवडणुकीत भाजप एकटय़ाच्या बळावर १५२ जागा जिंकेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणात केला होता. हा धागा पकडत विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ किंवा त्यापेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि इतक्या जागा जिंकण्यासाठी आवश्यक त्या जागा लढवेल, असा दावा फडणवीस यांनी केला. आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठीही आपल्याला मेहनत घ्यायची आहे, नव्या मित्रांना बरोबर घेऊन हा महाविजय सकारायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

 ‘‘जनतेने पुन्हा मोदींच्या हाती देश दिला तर मागे वळून पाहावे लागणार नाही. त्यामुळे नऊ ते दहा महिने महत्त्वाचे आहेत. मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर षडयंत्र सुरू आहे’’, असेही फडणवीस म्हणाले. जे पक्ष बरोबर येतील, त्यांना घेऊ. पण, तुष्टीकरण करणारी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि एमआयएम यांना कधी बरोबर घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समन्वयासाठी समिती

महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी १२ जणांची समिती तयार करण्यात आली आहे. त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार सदस्य असून या समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड हे आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. काँग्रेसच्या आमदारांना भाजपची दारे उघडी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चा

एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे या उपस्थित नव्हत्या. पंकजा या नाराज असल्याची चर्चा असताना त्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, ‘‘काल पंकजा मुंडे यांच्याशी बोललो. त्यांच्या लहान बहिणीच्या पायाला दुखापत झाल्याने त्या बैठकीला येऊ शकल्या नाहीत.’’

उद्धव ठाकरेंवर टीका

‘‘काही लोक पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेतात. पण, त्यांनी खोटी शपथ घेताना देवीची मनातून माफी मागितली असेल आणि देवीनेही त्यांना माफ केले असेल’’, अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी जे केले त्याला बेईमानीशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरून मते मागितली आणि नंतर काँग्रेसशी घरोबा केला. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बेईमानी होते, तेव्हा कुटनीती वापरावी लागते. महाभारतातही हेच घडले. उद्धव यांनी दगाबाजी केल्यामुळे कुटनीतीचा वापर केला’’, असे फडणवीस म्हणाले.

जागावाटप कसे?

’आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किमान ९० जागांवर निवडणूक लढवेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुंबईतील मेळाव्यात जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

’देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी गुरुवारी किमान १५२ जागांच्या विजयाचे लक्ष्य जाहीर केले. इतक्या जागांवर विजय मिळविण्यासाठी नेमक्या किती जागांवर निवडणूक लढविणार, हे या नेत्यांनी स्पष्ट केलेले नाही.

’आपल्याबरोबर आलेल्या ५० जणांना निवडून आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

’भाजपचे १५२ जागांचे लक्ष्य, शिंदे गटाने विजयाचा निर्धार केलेल्या ५० जागा  आणि अजित पवारांनी जाहीर केलेल्या ९० जागांची बेरीज २९२ होते. विधानसभेची सदस्यसंख्या २८८ असताना महायुतीत जागावाटप नेमके कसे होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis expressed confidence about bjp to win 152 seats in the upcoming assembly elections zws
Show comments