ठाणे : सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी संपूर्ण राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. तसेच सरकारच्या शाळा दत्तक घेऊन तेथील शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी उद्योगपती गौतम सिंघानिया यांना केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नगरविकास आणि गृहनिर्माण अशी दोन्ही खाती माझ्याकडेच आहेत. त्यामुळे घरांसंबंधी कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्याकडेच आहे. सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे. त्यासाठी ठाणे, मुंबई, मुंबई महानगर आणि संपुर्ण राज्यात परवडणारी घरे उभारणे. परवडणारी भाडे तत्त्वावरील घरे उभारणे, असा आमच्या सरकारचा अजेंडा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाण्यात मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना, इमारतमधील लॉन्ड्री दुकानात आग लागल्याने सर्वत्र पसरला होता धूर

परदेशातील वाहनांच्या पूर्णनिर्मितीचे काम आपल्या इथे सुरू होईल आणि यामुळे नागरीकांना नोकऱ्या आणि रोजगार उपल्ब्ध होईल. त्यामुळे ठाणे खऱ्या अर्थाने बदलत आहे. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले. आमच्या सरकारने विकासाभिमुख काम केले असून विकास हाच आमच्या सरकारचा आजवर अजेंडा राहिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण

शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करा

सर्वकाही पैशांनी विकत घेता येते. पण, विश्वास आणि इमानदारी पैशांनी विकत घेता येत नाही. हेच काम रेमंड समूहाने केले आहे. कापड व्यवसायात असलेल्या या समूहाने संपूर्ण देशाला एका कपड्याच्या धाग्यात विश्वासाच्या नात्याने बांधले आहे. हा समूह प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रात हा समूह कार्यरत असून ५० हजार हून अधिक मुलांना शिक्षण देण्याच्या काम करत आहे. या समूहाने शासनाच्या शाळा दत्तक घेऊन तेथील शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगपती गौतम सिंघानिया यांना केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde said our agenda to build affordable homes in the state for the common man css