लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधून २६ जूनपासून ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान राबविले जाणार आहे. व्यसनाधीनता रोखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानात शाळा आणि महाविद्यालयामध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि समाज विकास विभागाने कॉज फाऊंडेशनच्या मदतीने व्यसनमुक्ती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची सुरुवात २६ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी किसननगर विभागातील महिला बचत गटातर्फे काढण्यात येणाऱ्या रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. त्याचदिवशी दुपारी १२.३० वाजता ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळा क्र.१ आणि शाळा क्र. १५ मधील आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ऑल सेंट इन्टरनॅशनल कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

कॉज फाऊंडेशनच्या समुपदेशक कल्पना मोरे आणि रंजना वाघमारे या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रश्नोत्तरे, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांवर लक्ष केंद्रीत करुन तरूणांना निरोगी, व्यसनमुक्त जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. संपूर्ण वर्षभर अशा प्रकारच्या उपक्रमाचे विविध शाळा आणि महाविद्यालयात आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जाणार आहे. कॉज फाऊंडेशन ही सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असलेली महिला व बालसुरक्षा संस्था असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: De addiction campaign for students by thane municipality and cause foundation in thane dvr
Show comments